

Victor Axelsen retirement
esakal
किशोर पेटकर
जागतिक बॅडमिंटन कोर्ट गाजवत असताना त्याने तीन वेळा युरोपीयविजेतेपद आणि दोन वेळा ऑल इंग्लंड किताबही पटकावला. ताकदीवर भर देणाऱ्या युरोपीय जोशपूर्ण खेळास ॲक्सेलसनने आशियाई तांत्रिक शैलीची जोडही दिली. चिनी बॅडमिंटन पद्धतीशी अवगत होण्यासाठी मँडरिन भाषाही अवगत केली.
शरीर तंदुरुस्ती प्रक्रियेला सकारात्मक साथ देत नसल्यामुळे अखेर दिग्गज पुरुष बॅडमिंटनपटू व्हिक्टर ॲक्सेलसन याने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे डेन्मार्कचा हा महान बॅडमिंटनपटू २०२८मधील लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधण्याच्या शर्यतीत नसेल. जागतिक बॅडमिंटनमधील आशियाई वर्चस्वाला यशस्वी आव्हान देण्यास सफल ठरलेला ॲक्सेलसन २०२० टोकियो (कोविडमुळे २०२१मध्ये झालेल्या), तसेच २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्यापूर्वी २०१६मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये महान चिनी खेळाडू लिन डॅन याला नमवून ॲक्सेलसनने ब्राँझपदक जिंकले होते. डॅनची कारकीर्द अस्ताला जात असताना ॲक्सेलसनचा उंचावता आलेख सुरू झाला. त्याची लक्षवेधी कारकीर्द १६ वर्षांची ठरली. २०१०मध्ये जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत विजेतेपदासह आंतरराष्ट्रीय आगमनाचा शंखनाद केला. तेव्हापासून जागतिक बॅडमिंटनमध्ये ॲक्सेलसनचा झंझावात सुरू झाला. २०१६ हे त्याच्या कारकिर्दीतील संस्मरणीय वर्ष ठरले. ऑलिंपिक ब्राँझपदक, वर्ल्ड सुपर सीरिज फायनल विजेतेपद, तसेच थॉमस कप सांघिक जेतेपद मिळवत त्याने जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थान पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले.