

Vitamin D3 and K2
esakal
डॉ. सुबोध देशमुख
पूर्वीच्या काळी नैसर्गिकरित्या हिरवे गवत खाणाऱ्या गायी-म्हशींच्या दुधात, लोण्यात आणि तुपात व्हिटॅमिन के २ मुबलक प्रमाणात मिळायचे. मात्र आजच्या आधुनिक डेअरी फार्मिंगमध्ये गुरांना सुका चारा आणि कृत्रिम खाद्य दिले जाते, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांमधील के २चे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.
गेल्या काही वर्षांत आपल्या देशात व्हिटॅमिन डी ३च्या कमतरतेविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. बहुतांश लोक आता डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा स्वतःहून व्हिटॅमिन डी ३च्या सप्लिमेंट्स घेताना दिसतात. हाडांच्या बळकटीसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन डी ३ आवश्यक आहे यात शंका नाही, पण वैद्यकीय विज्ञानातील नवीन संशोधनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. केवळ व्हिटॅमिन डी ३ किंवा कॅल्शियम घेणे शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित नसते, तर त्यासोबत ‘व्हिटॅमिन के २’ही असणे तितकेच अनिवार्य असते. व्हिटॅमिन डी ३ आणि के २ या दोन जीवनसत्त्वांची जोडी शरीरात कॅल्शियमचे योग्य व्यवस्थापन करण्याचे काम करते. या लेखातून आपण या दोन जीवनसत्त्वांच्या अनोख्या जोडगोळीचे शास्त्र सविस्तर समजून घेऊ या.