

Vitthal Bhakti Tradition
esakal
महाराष्ट्रात केवढे तरी पंथ, धर्म, संप्रदाय अस्तित्वात असताना सर्वसामान्य माणूस केवळ विठ्ठलभक्तीकडेच का ओढला गेला असावा? जवळजवळ हजार वर्षे तरी आख्खा महाराष्ट्र या विठ्ठलभक्तीने का आणि कसा झपाटला गेला असावा, त्याच्या भेटीसाठी का असा उसासून जात असावा, नेमका हा विठ्ठल तरी आहे कसा आणि तो कुठून आमच्या जीवनात प्रवेश करता झाला याचाही विचार होणे, तो शोध घेणे महत्त्वाचे ठरावे.
मराठी संत परंपरा फार प्राचीन आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या नामदेव-ज्ञानेश्वरांच्या आधीपासून ही संत परंपरा अस्तित्वात असल्याचे अनेक संदर्भ दिसून येतात. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबात त्यांच्या आधी तीन पिढ्या (त्र्यंबकपंत (यांना गोरखनाथांचा अनुग्रह झाला होता), त्यानंतर गोविंदपंत, विठ्ठलपंत या तीन पिढ्या) आणि नामदेवांच्या आधी त्यांच्या कुटुंबातल्या जवळजवळ सहा पिढ्या विठ्ठलाच्या उपासक असल्याचे संदर्भ आहेत. नामदेवांचाच विचार केला, तर यदुशेट - हरिशेट - गोपाळशेट - गोविंदशेट - नरहरशेट - दामाशेट अशा सहा पिढ्या विठ्ठलभक्तीत रमलेल्या दिसतात. नामदेवांचे पूर्वज विठ्ठलभक्तीत रमलेले होते. महाराष्ट्रात ही विठ्ठलभक्ती कधीपासून सुरू झाली किंवा विठ्ठल हे दैवत कधी स्थापन झाले, हा शोध घेतला तर या विठ्ठलभक्तीचे मूळ सापडू शकेल.