

Exploring Washington DC and Its Architecture
esakal
अंकिता कार्ले
वॉशिंग्टन डी.सी.मध्ये आल्यापासूनच ते शहर मला खूप आवडले. मी राहत असलेल्या हार्टफर्ड शहराइतके वॉशिंग्टन मोकळे नाही, ना न्यूयॉर्कइतके गजबलेले. फिरताना थंडी, वारा, ऊन यांनी योग्य साथ दिल्यामुळे चालत भरपूर हिंडता आले. या शहरातील इमारतींची स्थापत्यरचना आजच्या काळातील म्हणजेच कंटेम्पररी प्रकारातील आहेत.
अलीकडेच आम्ही वॉशिंग्टन डी.सी.ला भेट दिली. आम्ही ज्या देशात राहतो, त्या देशाची म्हणजेच अमेरिकेची राजधान कशी आहे, हे बघण्याची उत्सुकता आम्हा सगळ्यांनाच होती. राजधानी बघण्यातील गंमतही निराळीच असते. कारण राजधानी त्या देशाची आन-बान-शान असते. तिथे गेल्यावर बऱ्याच महत्त्वाच्या सरकारी इमारती बघता येतात. राजधानीचा खास माहोल बघता येतो. त्यामुळे आम्ही कारमधून वॉशिंग्टनला जाण्याचे ठरविले. त्यासाठी पूर्वनियोजनानुसार आम्ही सकाळीच निघालो. साधारण साडेसात वाजले होते. थंडी फार नव्हती. लांबसडक हायवे पार करत दहाच्या सुमारास न्यू जर्सीला पोहोचलो. तिथेच नाश्ता केला. न्यू जर्सीमध्ये अनेक भारतीय हॉटेल्स आहेत, त्यामुळे मस्तपैकी भारतीय खाद्यपदार्थांवर ताव मारला. प्रत्येकाने आपल्या आवडीचे पदार्थ घेतले. त्यानंतर फक्कड मसाला चहा पिऊन आम्ही पुढे निघालो. मग मधे कुठेही न थांबता आम्ही थेट वॉशिंग्टनला गेलो. एका दिवसाच्या मुक्कामासाठी आम्ही हॉटेल बुक केले होते. तिथे सामान ठेवून, फ्रेश होऊन फिरण्यासाठी बाहेर पडलो.