
सम्राट कदम
पश्चिम घाट हा जैवविविधतेचा एक आंतरराष्ट्रीय वारसा आहे. घनदाट अरण्ये, वैविध्यपूर्ण वनस्पती आणि असंख्य प्राणीप्रजातींच्या अधिवासामुळे युनेस्कोने पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. येथे आढळणाऱ्या दुर्मीळ वनस्पती, प्राणी एवढंच नव्हे, तर सूक्ष्मजीवांवरही मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. मात्र, पश्चिम घाटातील काही भागातच घनदाट वृक्षराजी का आढळते, यामागील ठोस शास्त्रीय कारणे अद्याप स्पष्ट नव्हती. अखेरीस, पुण्यातील शास्त्रज्ञांच्या एका गटाने सह्याद्री म्हणजेच संपूर्ण पश्चिम घाटातील घनदाट जंगलांचे एक महत्त्वपूर्ण रहस्य उजेडात आणले आहे.