अमोघ वैद्य
गुहा चित्रांमध्ये शिकारी धनुष्यबाण घेऊन हरणांमागे धावतायत, घोडेस्वार आणि हत्तीस्वार युद्धात उतरलेत, ढोलक वाजवणारे आणि नाचणारे लोक उत्सव साजरा करतायत असं बरंच काय काय बघायला मिळतं. शिकारीच्या २० दृश्यांपैकी नऊ दृश्यांमध्ये शिकारी स्त्रिया दिसतात, जणू त्या काळातही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत होत्या. युद्धदृश्यंही बरीच आहेत. घोडेस्वार, हत्तीस्वार, पायदळ सैनिक आणि योद्धे तलवारी, भाले, ढाली आणि कुऱ्हाडी घेऊन लढताना दिसतात.
यथा सुमेरु: प्रवरो नगानां यथाण्डजानां गरुड़: प्रधान:।
यथा नराणां प्रवर: क्षितीशस्तथा कलानामिह चित्रकल्प:।।
- विष्णुधरमोत्तर पुराण
जसा पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत सर्वांत श्रेष्ठ आहे, गरुड पक्ष्यांमध्ये प्रधान आहे, माणसांमध्ये राजा उत्तम आहे, तसेच कलांमध्ये चित्रकला सर्वश्रेष्ठ आहे.
माणसाला सर्वप्रथम अवगत झालेली कला ती चित्रकला. म्हणून चित्रकलेला नेहमी उच्च दर्जा दिला गेला आहे. कदाचित आदिमानवाला भाषा समजली नव्हती, पण त्याच्या हातात रंग होते आणि समोर दगडी भिंती. तो हातातला रंग फिरवून जो जो विचार मनात येत होता तो दगडांवर चितारू लागला. यातूनच जन्म झाला असावा कलेचा. हे फक्त खडक नाहीत, तर माणसाच्या स्वप्नांचे, संघर्षाचे आणि सर्जनशीलतेचे अमर पडसाद आहेत. प्रत्येक चित्रातून माणूस सांगतो, ‘‘मी इथं होतो, मी इथं स्वप्नं बघितली, मी इथं लढलो, मी इथं हसलो.’’