अमोघ वैद्य
एडक्कलच्या गुहेतल्या आकृत्या एकाच संस्कृतीतून आल्या की वेगवेगळ्या काळात स्वतंत्रपणे केल्या गेल्या हे नक्की सांगणं कठीण आहे. पण असं वाटतं, की या आकृत्या बदलत्या समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हळूहळू जोडल्या गेल्या, एका मोठ्या सांस्कृतिक चौकटीत!
**
केरळ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवीगार जंगलं, खळखळणारे झरे आणि पश्चिम घाटाचे उंच डोंगर. ‘कुठं फिरायला जाऊया?’ या प्रश्नाच्या उत्तरच्या यादीमध्ये केरळ पहिल्या पाचात येतं. या निसर्गाच्या कुशीत हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास दडलाय.
भारतात नावाश्मयुग सुरू झालं तेव्हाचा, म्हणजे साधारण इ.स. पूर्व ३००० ते १५००चा काळ. हा काळ माणसाच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आला. लोकांनी शिकार सोडून शेती सुरू केली, मातीची भांडी तयार केली आणि दगडाच्या कुऱ्हाडींसारखी हत्यारं वापरायला सुरुवात केली. दक्षिण भारतात, विशेषतः केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूत या काळातले अवशेष सापडतात, कुऱ्हाड, छोटी दगडी हत्यारं आणि कधीकधी मातीची खेळणीसुद्धा. पण केरळच्या वायनाडसारख्या डोंगराळ भागात हा काळ काही वेगळंच सांगून जातो.