नॉमिनी व वारस यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे ? नॉमिनी लावल्यावर मृत्युपत्राची गरज आहे का? जाणून घ्या

विविध देशांतील मिळकतीला एकच मृत्युपत्र चालते का?
Legal will
Legal willEsakal

अॅड. सायली गानू- दाबके

मी माझ्या बहुतांशी सगळ्या गुंतवणुकीच्या बाबतीत नॉमिनेशन केले आहे. तरीही मी इच्छापत्रदेखील करायला हवे का, आणि त्यात या सगळ्या गुंतवणुकीबद्दल लिहिले पाहिजे का?

अगदी सोप्या शब्दात सांगायचे, तर नॉमिनी नेमणे म्हणजेच बँक किंवा जिथे तुमची गुंतवणूक आहे अशा संस्थेला अशा एका व्यक्तीचे नाव सांगून ठेवणे जिच्या हातात तुमच्या मालकीची गुंतवणूक दिली, की त्या पैशांच्या बाबतीत बँकेची किंवा त्या संस्थेची जबाबदारी कायद्याच्या दृष्टीने संपते. (अर्थातच याबद्दलही तपशिलातले नियम आहेत, पण हे अगदी साध्या शब्दातले वर्णन.)

कायद्यानुसार नॉमिनी व वारस ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत. नॉमिनी म्हणून नेमलेली व्यक्ती जर मृत व्यक्तीची कायदेशीर वारस नसेल तर नॉमिनीच्या ताब्यात असलेल्या गुंतवणुकीबाबत नॉमिनीची जबाबदारी विश्वस्ताची असते. म्हणजेच सदरची रक्कम ही कायद्याच्या दृष्टीने योग्य त्या वारसाच्या/ वारसांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी नॉमिनीवर असते. नॉमिनी म्हणजे कायद्याच्या दृष्टीने संपत्तीचा मालक नाही. वारसांपैकीच एकाला नॉमिनी नेमता येत असले तरी नॉमिनी नेमले म्हणून वारसाहक्क निर्माण होत नाही.

उदाहरणार्थ, दोन मुले व पत्नी असे नैसर्गिक वारस असणाऱ्या व्यक्तीने फक्त पत्नीलाच नॉमिनी नेमले, तरी येणाऱ्या रकमेवर मालकी मात्र दोन्ही मुले व पत्नी यांची प्रत्येकी एक-तृतीयांश एवढी असेल.

कायद्याच्या दृष्टीने तुमचे नैसर्गिक वारस कोण हे तुम्ही समजून घ्यावे. एकापेक्षा जास्ती वारस असतील व बाकी वारसांना वगळून जर फक्त नॉमिनीला वारस नेमायचे असेल तर नक्की इच्छापत्र करावे. नॉमिनीला मालकीहक्क देण्यासाठी फक्त नॉमिनेशन पुरेसे नाही.

माझे वय ६० वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. आज मी दुसरे लग्न करू इच्छितो. माझ्या होणाऱ्या पत्नीस आधीच्या लग्नापासून मूलबाळ नाही. माझ्या मुलांच्या वारसाहक्कावर माझ्या या लग्नामुळे काय परिणाम होईल?

तुम्ही हिंदू पुरुष आहात हे गृहीत धरून उत्तर देत आहे. हिंदू पुरुषाच्या नैसर्गिक वारसांमध्ये आई, पत्नी आणि मुलांना प्राधान्यक्रम दिला जातो. हे सर्वजण सारख्याच श्रेणीतले वारस समजले जातात. त्यामुळे तुमच्या लग्नानंतर तुमच्या मुलांच्या बरोबरीने दुसऱ्या पत्नीलादेखील वारसाहक्क मिळेल. ते सर्वजण तुमच्या सर्व मिळकतींमध्ये समान वाट्याचे मालक होतील. तुमच्या पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलांना तुमच्या दुसऱ्या लग्नानंतर काही निश्चित अशी संपत्ती द्यायची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही इच्छापत्र करून तुमच्या संपत्तीची वाटणी विविध व्यक्तींमध्ये कशा प्रकारे व्हावी, याच्या नेमक्या सूचना लिहून ठेवू शकता.

माझी विविध देशांत मिळकत आहे. तर या सगळ्या मिळकतींबाबत एकच मृत्युपत्र केलेले चालेल का?

सामान्यपणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्यावेळी तिचे एकच इच्छापत्र असणे अपेक्षित आहे. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये एकापेक्षा जास्ती मृत्युपत्रे ग्राह्य धरली जाऊ शकतात. पण हा नियमाला अपवाद आहे.

विविध देशातील वारसाहक्क व इच्छापत्राविषयी कायदे वेगवेगळे असतात. सहसा त्या देशातील कायद्यानुसार करण्यात आलेले इच्छापत्रच त्या देशातील मिळकतीच्या बाबतीत ग्राह्य धरले जाते. अशा एकावेळी विविध देशातील कायद्याच्या नियमांनुसार केलेल्या एकापेक्षा जास्ती इच्छापत्रांना समकालिक इच्छापत्र म्हणतात.

तुमच्या ज्या ज्या देशात मालमत्ता आहेत त्यातील इच्छापत्रासंबंधातील कायदे माहिती करून घ्या. या कायद्यांनुसार त्या त्या देशातील नियमांनुसार जर वेगळे इच्छापत्र करणे गरजेचे ठरत असेल, तर ते करताना प्रत्येक इच्छापत्रात इतर देशातील मिळकतीचे वर्णन करून त्या त्या मिळकतीच्या बाबतीत त्या त्या देशात केलेल्या इच्छापत्राचा संदर्भ द्यावा हे श्रेयस्कर.

महत्त्वाचे : या लेखमालेत प्रश्‍नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे. तरी या उत्तरांना कायदेशीर सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधाराने कुठलेही कायदेशीर पाऊल उचलू नये. आपले प्रश्न व शंकांबद्दल वकिलांचा सल्ला घेऊनच योग्य ती कृती करावी.

--------------------

Legal will
मृत्यूपत्र बनवणं का गरजेचं आहे? Legal Will मध्ये नेमकं काय लिहायचं असतं? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com