अवनीवाच्या गोष्टी । मैत्रेयी पंडित-दांडेकर
आम्हाला कोणतासा सुपरहिरो करण्याची पालकांची अखंड धडपड वर्षांनुवर्षे सुरूच राहते आणि प्रत्यक्षात मात्र आम्ही स्पायडरमॅनऐवजी क्लासच्या अचाट जाळ्यात गुंतवलेले पुचाट कोळी होऊन जातो!
आम्हाला मम्माकडून तिच्या लहानपणाची झलक सारखी मिळत असते. कडक शिस्तीची शाळा; शाळेतले शिक्षक, मित्रमंडळ, मित्रांचे पालक, आमची प्रगती किंवा मित्रांची प्रगती या कशातच त्या काळातले पालक फारसे ढवळाढवळ करत नसत असं एकंदर मी ऐकून आहे.
पहिला क्लासपण म्हणे मम्मानं आठवीत लावला. खरंतर हिस्टरी रीपीट्स असं म्हणतात. पण आमची शाळा, आमचे क्लास, आमचे शिक्षक, आमचं मित्रमंडळ, त्यांचे पालक, आमची प्रगती किंवा आमच्या मित्रांची प्रगती याबाबतीत ढवळाढवळ न करण्याची हिस्टरी अजिबात रीपीट झाली नाहीये.