
प्रसाद नामजोशी, पुणे
एखाद्या लेखिकेनं लिहिलेल्या कादंबरीच्या पात्रांचा, कल्पनांचा उगम नक्की कुठं झाला असेल याची कल्पना करत एखाद्या शहरात चालत चालत फिरणं, हा एक प्रसन्न करणारा अनुभव होता. आपण नुसतेच टुरिस्ट नाही तर वाचक आहोत, लेखकाच्या लेखनप्रेरणा शोधणारे वाचक आहोत, या कल्पनेमुळे सर्वच जण सुखावले होते...
आपल्या आवडत्या लेखकाचं कौतुक कसं करावं ही गोष्ट युरोपियन वाचकांकडून शिकावी. अनेक शहरांमध्ये साहित्य महोत्सव आयोजित केले जातात. वेल्सचा हाय महोत्सव किंवा एडिंबराचा आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव प्रसिद्ध आहे.
इथं लेखक आपल्या साहित्याचं वाचन करतात, चर्चा करतात, वाचकांशी बोलतात. स्पेनमध्ये ‘डिया डेल लिब्रो’ म्हणजे पुस्तक दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. युरोपियन नगरसेवक स्वतःच्या मायबापांची नावं चौकाला द्यायचा आग्रह करत नाहीत, तर लेखकांची शिल्पं, स्मारकं उभारायला त्यांना आवडतं.
गेल्या काही दशकांतल्या पुस्तक विक्रीचे अनेक नवे विक्रम करणाऱ्या आणि सर्वाधिक वाचल्या गेलेल्या लेखकांपैकी एक असलेल्या जे.के. रोलिंग हिचं कौतुक काही केल्या थांबायला तयार नाही. तिच्या हॅरी पॉटर आणि त्याच्या जादुई विश्वातल्या सगळ्यांनीच जगभरातल्या वाचकांना वेड लावलेलं आहे.
आजवर हॅरी पॉटर पुस्तक मालिकेतल्या एकूण सात भागांच्या जगभरात तब्बल साठ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. एकूण चौऱ्याऐंशी भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या मालिकेतला हॅरी पॉटर ॲण्ड द डेथली हॉलोज हा शेवटचा भाग प्रकाशित झाला, तेव्हा पहिल्या चोवीस तासांत त्याच्या एक कोटी दहा लाख प्रती संपल्या होत्या!
हॅरी पॉटर मालिकेतली हॅरी पॉटर ॲण्ड सॉसरर्स स्टोन म्हणजे हॅरी पॉटर आणि परीस ही कादंबरी १९९७मध्ये प्रकाशित झाली आणि जगभर गाजली.
२०००मध्ये वॉर्नर ब्रदर्स या हॉलिवूडच्या चित्रपट निर्मिती कंपनीनं या कादंबरीतली पात्रं, त्यांची नावं आणि इतर सर्व हक्क विकत घेतले. आणि वर चित्रपटातले मुख्य कलाकार ब्रिटिशच असले पाहिजेत या रोलिंगबाईंच्या अटीसह! त्यांनी यासाठी रोलिंगबाईंना चक्क एक मिलियन पाऊंड दिले म्हणतात. म्हणजे सुमारे नऊ कोटी रुपये! लेखकानं पैसेही घ्यावेत, अटी घालाव्यात आणि कहर म्हणजे निर्मात्यानं त्या ऐकाव्यात हे जरा अतीच झालं.
आजवर हॅरी पॉटर मालिकेत एकूण आठ चित्रपट झालेले आहेत आणि एकूण तिकीटबारीवरची कमाई आहे पासष्ट हजार कोटी रुपये. यापुढे जगाचं विभाजन हॅरी पॉटर वाचलेले आणि हॅरी पॉटर न वाचलेले अशाही दोन भागात करता येईल अशी परिस्थिती आहे.
पुस्तक विक्रीचे हे सगळे विक्रम आपल्या नावावर असणाऱ्या आणि पूर्ण वेळ लेखक असलेल्या जे.के. रोलिंग यांची संपत्ती सुमारे ब्याऐंशी कोटी पाऊंड आहे. म्हणजे सुमारे नऊ हजार कोटी रुपये! जगातली सगळ्यात श्रीमंत लेखक असणाऱ्या रोलिंगबाईंचं कौतुक अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी होत असतंच.