महायोगी गोरक्षनाथ : बौद्ध-शैव-शाक्त आणि नाथ

कौल व कापालिक संकल्पना समजून घेतल्यास नाथसंप्रदायाची तात्त्विक बैठक आणि महायोगी गोरक्षनाथांचे जीवनकार्य
Mahayogi Gorakhnath
Mahayogi Gorakhnathsakal

Mahayogi Gorakhnath Nath Sampradaya

महायोगी गोरक्षनाथ ज्या नाथ संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून ओळखले जातात, त्या नाथसंप्रदायाचा परिचय आणि ऐतिहासिक महत्त्व यांची ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. आपण आज ज्याला नाथसंप्रदाय म्हणून ओळखतो, त्याचा विविध सांप्रदायिक ग्रंथांमध्ये सिद्ध मत, सिद्ध मार्ग, योगमार्ग, योगसंप्रदाय, अवधूत मत, अवधूत संप्रदाय इत्यादी नावांनी उल्लेख करण्यात आलेला आहे.

गोरक्षनाथांचे शिष्य स्वात्माराम यांनी लिहिलेला ‘हठयोग प्रदीपिका’ हा ग्रंथ नाथसंप्रदायाचा एक आधारभूत ग्रंथ म्हणून ओळखला जातो. ह्या ग्रंथावर ब्रह्मानंद यांनी केलेले ‘हठप्रदीपिका जोत्स्ना’ नावाचे भाष्य सर्वात प्रमाण मानले जाते. यामध्ये ब्रह्मानंद यांनी लिहिलेले आहे, ‘सर्व नाथांमध्ये प्रथम आदिनाथ आहेत. म्हणजे स्वयं शिव आहेत, असा नाथ संप्रदायाचा विश्वास आहे.

यावरून असे अनुमान केले जाऊ शकते, की ब्रह्मानंद या संप्रदायाला ‘नाथ संप्रदाय’ नावानेच ओळखत असावेत. डॉ. हजारी प्रसाद द्विवेदी यांना नाथ संप्रदायासाठी ‘योगसंप्रदाय’ किंवा ‘योग मत’ हे नाव योग्य वाटते. कारण त्यांचा मुख्य धर्म योगाभ्यास आहे. नाथपंथीय स्वतःच्या मार्गाला ‘सिद्धमत’ अथवा ‘सिद्ध मार्ग’ यासाठी संबोधतात, की त्यांच्या मते त्यांचे नाथच सिद्ध आहेत.

नाथपंथाचा एक अत्यंत प्रामाणिक ग्रंथ म्हणून ओळखला जाणारा ‘सिद्ध सिद्धांत पद्धती’ हा अठराव्या शतकाच्या अखेरीस काशीच्या बलभद्र पंडित यांनी संक्षिप्त स्वरूपात लिहिला. त्याला ‘सिद्ध सिद्धांत संग्रह’ असे नाव दिले. खूप प्राचीन काळापासून नाथसंप्रदायाला ‘सिद्ध मत’ असेच संबोधले जात आहे असे या सर्व ग्रंथांच्या नावावरून लक्षात येते.

‘सिद्धांत’ या संकल्पनेची खरी व्याख्या वाद-प्रतिवाद अथवा खंडन-मंडन यातून प्रमाण मानण्यात आलेला अर्थ असा होतो. मात्र नाथसंप्रदायात सिद्धांताचा हा अर्थ अभिप्रेत नाही. येथे सिद्धांद्वारे कथित तत्त्वांनाच ‘सिद्धांत’ म्हटले जाते. यामुळेच आपल्या संप्रदायाच्या ग्रंथांनाच नाथ सांप्रदायाचे अनुयायी ‘सिद्धांत ग्रंथ’ असे म्हणतात.

नाथसंप्रदायात एक अशी मान्यता आहे की आदि शंकराचार्य अखेरीस नाथ संप्रदायाचे अनुयायी झाले होते. याच अवस्थेत त्यांनी ‘सिद्धांत बिंदु’ ग्रंथ लिहिला.‘गोरक्ष सिद्धांत संग्रह’ ह्या ग्रंथात नाथसंप्रदायिकांनी स्वतःच्या मताला ‘अवधूत मत’ संबोधले आहे. यामध्ये ‘अस्माकं मतं त्ववधूतमेव’ असे म्हटले आहे.

कबीरदासांनीदेखील ‘अवधू’ हा शब्द वापरताना अवधूत मताकडेच लक्ष वेधले आहे. कधी कधी कबीरदास या मार्गातील ढोंगी साधूंसाठी ‘कच्चे सिद्ध’ असा शब्दप्रयोग करतात. ‘रामचरितमानस’मध्ये तुलसीदास सिद्ध मताच्या भक्तीहीनतेकडे इशारा करतात. तुलसीदासांच्या इतर ग्रंथांवरून असे लक्षात येते, की त्यांच्या मते गोरक्षनाथांनी योगमार्ग प्रचलित करून भक्ती मार्गाला दूर केले.

रामचरितमानस ग्रंथाच्या आरंभी लिहिलेल्या शिववंदनेत तुलसीदास म्हणतात, की ‘श्रद्धा आणि विश्वास यांचे साक्षात स्वरूप म्हणजे पार्वती आणि शिव आहे. ह्या दोन गुणांच्या अभावामुळेच सिद्ध लोक स्वतःच्या अंतरीच्या ईश्वराला पाहू शकत नाही.’ येथे सिद्ध ह्या शब्दातून त्यांना नाथपंथीयांचाच उल्लेख करायचा होता. यावरून तुलसीदासदेखील नाथपंथीयांचा उल्लेख ‘सिद्ध मत’ असाच करतात असे दिसून येते.

तुलसीदासांच्या टीकेचा आधार घेतल्यास आणखी एक गोष्ट लक्षात येते, की नाथांनी एका अर्थाने भक्ती मार्गाच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या कर्मकांडांना नाकारले होते. तसेच नाथांचा धागा बौद्ध परंपरेशी असल्यामुळे कदाचित तुलसीदासांना याच्यामुळेही सिद्ध मत आणि विशेष करून गोरक्षनाथांचा राग असावा. जो त्यांनी विविध प्रकारे व्यक्त केला असावा. नाथ हे पूर्वीचे बौद्ध होते, ह्या मताला अशा टीकांमुळे नकळतपणे आधार मिळतो.

मिथिलेचा राजा हरिसिंह देव (इसवी सन १३०० ते १३२१) याच्या दरबारात असलेला ग्रंथकार कविशेखराचार्य ज्योतिरीश्वर याने आपल्या ‘वर्ण रत्नाकर’ ग्रंथात चौऱ्याऐंशी नाथ सिद्धांची दिलेली यादी, सहजयानी सिद्धांची यादी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी दिलेली वज्रयानी सिद्धांची यादी पाहिल्यास सिद्धाच्या नावापुढे ‘पा’ लावण्याची पद्धत दिसून येते.

नावापुढे ‘पा’ असण्याची पद्धत सर्वसाधारणपणे तिबेटमध्ये दिसून येते. तिबेट म्हटल्यावर बौद्ध धर्म हे समीकरणदेखील डोळयासमोर येते. या याद्यांमध्ये गोरक्षनाथांचा उल्लेख गोरक्षपा, चौरंगीनाथांचा उल्लेख चौरंगीपा, जालंधरनाथांचा उल्लेख जालंधरपा असा केलेला आढळतो. अशी आणखी सिद्धांची उदाहरणे देता येतात.

त्याचबरोबर काही नावांमधील बदल वगळता सर्व याद्यांमधील सिद्ध देखील सारखे आहेत. त्यामुळे नाथांचा बौद्ध परंपरेशी असलेला संबंधदेखील सिद्ध होतो.मत्स्येंद्रनाथांच्या ‘कौलज्ञाननिर्णयः’ ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायावरून असे लक्षात येते की ते ज्या संप्रदायाचे अनुयायी होते त्याचे नाव ‘सिद्ध कौल संप्रदाय’ असे होते.

प्रख्यात सायनो-इंडॉलॉजिस्ट डॉ. प्रबोध चंद्र बागची यांनी संपादित केलेल्या ‘कौलज्ञाननिर्णयः (KaulaJnana-Nirnaya) याच नावाच्या ग्रंथात म्हटले आहे, की ‘मत्स्येंद्रनाथांचा संप्रदाय सिद्ध संप्रदाय असला तरी त्यांनी नंतर ज्या संप्रदायाची स्थापना केली त्याचे नाव योगिनी कौलमार्ग होते.’ सिद्ध कौल मत कालांतराने नाथ परंपरा म्हणून विकसित झाले असा निष्कर्ष यावरून काढता येतो.

सिद्ध मत ते नाथसंप्रदाय असा हा प्रवास अधोरेखित करता येतो. नाथसंप्रदायाच्या नामाचा इतिहास पाहताना नाथांचा बौद्ध आणि शाक्त तत्त्वज्ञानाशी असलेला संबंध नकळतपणे जाणवू लागतो.नाथांमधील पहिले नाथ म्हणजे आदिनाथ स्वतः शिव मानले जातात. यावरून समग्र नाथ संप्रदाय शैव मानला जातो. कारण सर्व नाथपंथीयांची उपास्य देवता शिव आहे.

‘गोरक्ष सिद्धांत संग्रह’ ग्रंथांमध्ये शंकराचार्यांच्या अद्वैत मताच्या पराभवाची कथा देण्यात आली आहे. हा पराभव एका कापालिकाने केला, असेही कथा सांगते. हे सांगताना कथाकार सावध होतो. कापालिकाचा विजय ऐकून ग्रंथकाराला कोणी कापालिक मताचा अनुयायी समजू नये.

यासाठी तो म्हणतो, ‘यावरून असा कोणी समज करून घेऊ नये की आम्ही कापालिक आहोत. आमचा मार्ग हा अवधूतच आहे. एवढे मात्र खरे, की कापालिक मतदेखील श्री नाथानेच प्रकट केलेले आहे. त्याचबरोबर शाबरतंत्रामध्येदेखील कापालिकांच्या बारा आचार्यांमध्ये प्रथम नाव आदिनाथांचे आहे आणि उर्वरित अकरा आचार्यांपैकी अनेक जण नाथमार्गाचे प्रधान आचार्य आहेत.

त्याचप्रमाणे तंत्राधिष्ठित असलेल्या शाक्त मार्गाचे उपदेशकदेखील नाथच आहेत. नाथांनीच तंत्रमार्गाची स्थापना केली आहे. याची पुष्टी ‘षोडश नित्यतंत्र’ ग्रंथात स्वतः शिवानी केली आहे. येथे शिव स्वतः म्हणतात की मी सांगितलेला तंत्र मार्गाचा नवनाथांनी लोकांमध्ये प्रचार केला.’

नाथ आणि शाक्त संबंधांचे नेमके आकलन होण्यासाठी शाक्त मताचा परिचय आवश्यक ठरतो. शाक्त मतानुसार चार प्रधान आचार मानण्यात आले आहेत. यामध्ये वैदिक, वैष्णव, शैव आणि शाक्त यांचा समावेश होतो. शाक्त आचाराचे चार प्रकार सांगण्यात येतात.

ते म्हणजे वामाचार, दक्षिणाचार, सिद्धांताचार आणि कौलाचार. ‘षट् शांभव रहस्य’ ह्या ग्रंथानुसार वैदिक आचारापेक्षा वैष्णव श्रेष्ठ, वैष्णवांपेक्षा गाणपत्य श्रेष्ठ, गाणपत्यांपेक्षा सौर श्रेष्ठ, सौरांपेक्षा शैव श्रेष्ठ आणि शैवांपेक्षा शाक्त श्रेष्ठ. याचाच अर्थ शाक्त आचार सर्वश्रेष्ठ.

त्याचप्रकारे शाक्त आचारामध्ये वामचारापेक्षा दक्षिणाचार श्रेष्ठ, दक्षिणाचारापेक्षा सिद्धांताचार श्रेष्ठ आणि सिद्धांताचारापेक्षा कौलाचार श्रेष्ठ. शाक्त आचारातील कौलाचार सर्वश्रेष्ठ मानण्यात आला आहे. यालाच ‘अवधूत मार्ग’ असे संबोधण्यात आले आहे. त्यामुळे शाक्त तंत्र हे नाथांचे अनुयायी अथवा अनुकरण करणारे आहे, असेदेखील नाथ संप्रदायांच्या ग्रंथांमधून सांगण्यात आलेले दिसते.

शाक्त आगम तीन प्रकारचे सांगण्यात आलेले आहेत. सात्त्विक अधिकारी व्यक्तीसाठी असलेला आगम किंवा उपदेश म्हणजे ‘तंत्र’. राजस अधिकारी व्यक्तीसाठी असलेला उपदेशाला ‘यामल’ आणि तामस अधिकारी व्यक्तीसाठी असलेला उपदेशाला ‘डामर’ म्हटले जाते. तसेच तांत्रिकांचा सर्वश्रेष्ठ कौलाचार म्हणजे ‘अवधूत मार्ग’ असे सांगण्यात आले आहे.

‘गोरक्ष सिद्धांत संग्रह’ ग्रंथात तांत्रिक आणि अवधूत यांच्यातील भेददेखील सांगण्यात आलेला दिसतो. तसेच तांत्रिक लोक पहिले बहिरंग उपासना करतात आणि अखेरीस सिद्धी प्राप्त करून कुंडलिनी शक्तीची उपासना करतात. हा क्रम तंतोतंत अवधूत मार्गाप्रमाणेच आहे.

अशाप्रकारे नाथसंप्रदायाच्या ग्रंथांच्या आधारे हे सिद्ध होते, की तांत्रिकांचा कौलमार्ग आणि कापालिक मत नाथ मतानुयायी आहेत. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. ‘कौलज्ञाननिर्णयः’मध्ये अनेक कौल मतांचा समावेश आहे. त्यामध्ये एक योगिनी कौलदेखील आहे. हा योगिनी कौल मार्ग गोरक्षनाथांचे गुरू मत्स्येंद्रनाथ यांनी प्रतिपादन केलेला आहे.

नाथपंथाचा मार्ग बौद्ध-शैव-शाक्त असा होत कौल-कापालिक यांना कवेत घेत पुढे जातो. यासाठी कौल व कापालिक संकल्पना समजून घेतल्यास नाथसंप्रदायाची तात्त्विक बैठक आणि महायोगी गोरक्षनाथांचे जीवनकार्य यांचे नेमके आकलन होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com