Sant Kabir : कोण होते कमाल साहेब; संत कबीर यांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव कसा? जाणून घ्या..

कबीर साहेबांच्या वाणीतील परखडपणा आणि गोडवा ह्या दोन्ही गुणांची प्रचिती कमाल साहेबांच्या वाणीत दिसते..
sant kabir
sant kabirEsakal

डॉ. राहुल हांडे

कबीर साहेबांच्या वाणीतील परखडपणा आणि गोडवा ह्या दोन्ही गुणांची प्रचिती कमाल साहेबांच्या वाणीत दिसते. अहंकाराऐवजी विनम्रतापूर्वक आर्जव आणि समानतेचा आग्रह दिसून येतो.

कबीर साहेबांच्या जीवनाविषयी असलेल्या संदिग्धतेत अधिक भर घालणारे आणखी एक गूढ दालन म्हणजे त्यांचे कौटुंबिक जीवन. कबीर साहेब अविवाहित होते, येथपासून त्यांनी दोन विवाह केले होते येथपर्यंत कथा-दंतकथा उपलब्ध आहेत. त्यांचे प्रमाण चरित्र मात्र उपलब्ध नाही.

अशा परिस्थितीत त्यांच्या काही रचनांवरून अभ्यासकांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ह्या प्रयत्नांनुसार कबीर साहेबांच्या पत्नीचे नाव लोई होते आणि त्यांना कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी होती.

कबीर साहेब आणि लोई यांच्यात मतभेद असल्याचा निष्कर्ष त्यांच्या काही दोह्यांवरून अभ्यासकांनी काढलेला आहे. विरक्तीमुळे प्रपंचाची झालेली वाताहत हे लोई आणि कबीर साहेबांतील मतभेदांचे केंद्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोइ तुकोबांच्या आवलीप्रमाणेच असावी यात शंका नाही. अन्यथा कबीर साहेबांसारख्या वादळाचा प्रपंच शक्य नव्हता.

उत्तर भारतीय भक्ती आंदोलनात कबीर साहेबांचे पुत्र कमाल साहेब यांचा एक अधिकारी संत म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो. असे असले तरी त्यांच्याही जीवनाबद्दल निश्चित व प्रमाण माहिती उपलब्ध नाही.

त्यांचा जन्म-मृत्यू आणि जीवनप्रवास कबीर साहेबांप्रमाणेच कथा-दंतकथांमध्ये विरघळलेला दिसतो. कथा-दंतकथांच्या ह्या मंथनातून पं. परशुराम चतुर्वेदी, डॉ.हजारीप्रसाद द्विवेदी यांच्यासारख्या संशोधकांनी कमाल साहेबांचे जीवनचरित्र रेखाटलेले दिसते.

कबीर साहेबांचे पुत्र आणि शिष्य ह्या दोन धुव्रांवर संत कमाल यांचे चरित्र आंदोलित होताना दिसते. एका बाजूला पित्याच्या विरक्तीपायी घरात सदैव नांदणाऱ्या दारिद्रयाने अस्वस्थ होऊन अजाण वयात पित्याविरुद्ध विद्रोह करणारे पुत्र कमाल दिसतात.

दुसऱ्या बाजूला पित्याच्या मार्गावर निष्ठेनं चालत एक अधिकारी संत म्हणून लौकिक प्राप्त करणारे शिष्य कमाल दिसतात. कबीर पंथीय ग्रंथ बोधसागरमध्ये कमाल साहेबांचे जीवन व त्यांनी केलेला प्रवास याविषयी अल्प प्रमाणात माहिती देण्यात आलेली आहे.

कबीर साहेबांच्या आदेशावरून संतमताच्या प्रसारासाठी ते गुजरातमधील अहमदाबादकडे गेले होते. गुजरातमधील दादू दयाल यांच्या गुरु परंपरेत कमाल यांचा करण्यात आलेला समावेश ह्या घटनेला पुष्टी देणारा ठरतो.

त्याचबरोबर कमाल साहेबांच्या अनेक पदांमध्ये त्यांच्या महाराष्ट्रातील आणि विशेषतः पंढरपूर येथील यात्रेचे वर्णन आलेले आहे. विठ्ठलाची मूर्ती, चंद्रभागा आणि वारकरी संतांचादेखील त्यांनी उल्लेख व प्रशंसा केलेली दिसते.

महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील संतपरंपरेचा त्यांनी जोडलेला अनुबंध खूप महत्त्वाचा आहे. दक्षिणेत शिंपी नामदेव तर उत्तरेत रामचरणांचा दास कबीर आहे. दोघांचा भक्ती प्रांतात बोलबाला आहे -

दरवनम्यांने नामा दर्जी। उत्तरम्यांने भयो कबीर,रामचरण का बंदा है ।

उनोंका पूत कहे कमाल दोनों का बोलबाला है ।

‘हम यवन तुम तो हिंदू’ असा एका ठिकाणी उल्लेख करणाऱ्या कमाल साहेबांनी स्वतःचे मुस्लिम असणे मान्य केलेले दिसते. तसेच त्यांच्या पदरचनेतील भाषाशैलीत ‘मुरशिद मौला’ आदी शब्दांचे प्रयोग याला आधार देतात.

सुफींच्या सहवासातदेखील कमाल काही काळ आले असावेत, असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करतात. त्यांची पदरचना एकत्रित संग्रहित झालेली नाही. त्यामुळे ती विविध ग्रंथांमध्ये फुटकळ स्वरूपात उपलब्ध आहे.

त्यांच्या पदरचनेवरून सूफी मताचा त्यांच्यावरील प्रभाव मात्र स्पष्ट होतो. महर्षी शिवव्रतलाल वर्मा यांनी १९२३ साली लाहोर येथून प्रसिद्ध केलेल्या संतमाल ग्रंथात कमाल साहेबांवरील सूफी मताचा प्रभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

कबीर साहेब आणि कमाल यांच्यातील पिता-पुत्र म्हणून उद्‌भवलेल्या नैसर्गिक व वैचारिक संघर्षाचे आकलन होण्यासाठी एक प्रसंग अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

एकदा कमाल साहेब कबीर मताच्या प्रचारार्थ ग्वाल्हेरला गेले होते. त्याठिकाणी कबीर साहेबांवर श्रद्धा असलेल्या एका व्यापाऱ्याने खूप सारे धन कमाल साहेबांना देऊ केले; परंतु आपल्या विरक्तीव्रतानुसार त्यांनी धनाचा स्वीकार करण्यास नकार दिला.

कमाल साहेब आपल्याकडून काहीच स्वीकारत नाहीत, हे पाहिल्यानंतर तो व्यापारी व्यथित झाला. कमाल साहेब विश्राम करण्यासाठी गेल्यानंतर त्यानं एक हिरा त्यांच्या पगडीत लपवून ठेवला.

विश्रांती झाल्यानंतर कमाल साहेबांनी आपली पगडी डोक्यावर चढवली. आपल्या पगडीत हिरा आहे याची जाणीवदेखील त्यांना झाली नाही.

घरी आल्यानंतर पगडी सोडत असताना त्यातून तो हिरा खाली पडला. हे कबीर साहेबांनी पाहिले. आपला मुलगा मायेचा त्याग करू शकलेला नाही, असा त्यांचा गैरसमज झाला. त्यावेळी त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले -

नाम साहब का बेचकर, घर लाया धन-माल ।

बूडा बंस कबीर का, जनमा पूत कमाल ।।

परमेश्वराच्या नावाचा सौदा करून धनद्रव्य घरी घेऊन येणाऱ्या कमालमुळे कबीराचा वंश बुडाला. कमाल माझ्या वंशाला कलंक आहे, अशी भावना कबीर साहेबांनी व्यक्त केली.

काही दिवसांनी ग्वाल्हेरचा तो व्यापारी कबीर साहेबांकडे आला तेव्हा कमाल साहेबांच्या पगडीतील हिऱ्याची खरी कहाणी त्यांना समजली. त्यावेळी त्यांना समाधान वाटले.

भक्तमाल ग्रंथात हीच कथा वेगळ्यारितीने देण्यात आलेली आहे. एक राजा कबीर साहेबांचा शिष्य होण्यासाठी खूप धन घेऊन काशीला आला. त्याला हे धन काहीही करून कबीर साहेबांच्या चरणी अर्पण करायचे होते.

राजाला शिष्य करून घेण्यास कबीर साहेबांची हरकत नव्हती; परंतु त्याची धन देण्याची इच्छा त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे कबीर साहेबांनी राजाची भेट घेण्याचे टाळले. अखेर राजाने कमाल साहेबांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांना सोबत आणलेली धनसंपत्ती दिली.

कमालने राजाचे धन घेतले याबद्दल कबीर साहेब नाराज झाले. त्यावेळी त्यांनी उपरोक्त उद्‍गार काढले. गुरु ग्रंथ साहिबच्या तरतारण आवृत्तीमध्ये त्यांचा समावेश ‘सलोक’ म्हणून करण्यात आला आहे. गुरु ग्रंथ साहिबमध्ये कबीर साहेबांचे उद्‍गार खालील प्रमाणे देण्यात आले आहेत -

बूडा बंस कबीर का उपजिओ पूतु कमालु ।

हरिका सिमरनु छाडिकै, धरि लै आया मालु ।

कमाल साहेब मात्र आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांनी कबीर साहेबांना सांगितले, की राजाकडून धन घेऊन मी कोणतीही चूक केलेली नाही. धन घेऊन मी हरिनामाचा सौदा केलेला नाही. खरे पाहिले तर जगात रामनामाचा कोणीही ‘मोजो’ म्हणजेच मूल्य करू शकत नाही, असे असताना मी त्याचा सौदा कसा करेन.

कहहु तो राम के नाम को, मोजो कछुवै आहि ।

तो मैं बेचा होइहैं मोही बतावहु ताहि ।।

उपरोक्त घटनेसंदर्भात रागावलेल्या कबीर साहेबांना धन घेऊन राजाला शिष्य केल्यामुळे मला कोणताही कलंक लागलेला नाही. असे सांगताना कमाल साहेब म्हणतात -

कउडी शे हीरा भये, हीरा शे भये लाल ।।

आधा भगत कबीर थे, शरा भगत कमाल ।।

हरिनामामुळे तुम्ही (कबीर साहेब) कवडीपासून हिरा होण्यापर्यंतचा प्रवास केला. अशा हिऱ्याच्या पोटी मी जन्म घेतला. त्यामुळे मी हिऱ्यापेक्षाही ‘लाल’ म्हणजे चमकदार बनलो आहे. खरा विचार केला तर तुम्ही अर्धे भक्त मानले जाऊ शकता, मी मात्र पूर्ण भक्त झालो आहे.

कमाल साहेबांनी स्वतःला ‘पूर्ण भक्त’ मानणे आणि कबीर साहेबांना ‘अर्धे भक्त’ असे संबोधणे यामागे आणखी एक घटना दडलेली आहे. लहानपणी कमाल साहेब नेसत असलेली लंगोटी सैल असायची, हे कबीर साहेबांच्या लक्षात आले.

त्यावेळी त्यांनी कमाल साहेबांना लंगोटी कसून बांधावी, असे सांगितले. कबीर साहेबांच्या आदेशाचा भावार्थ कमाल साहेबांनी ब्रह्मचर्याशी जोडला आणि त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन केले. एका अर्थानं ते इंद्रियजीत झाले.

कबीर साहेब प्रपंच करून भक्त झाले, आपण मात्र ब्रह्मचर्याचे पालन करून भक्त झालो आहोत. यास्तव कबीर साहेब अर्धे भक्त आणि आपण पूर्ण भक्त असल्याचा दावा कमाल साहेब करतात.

कमाल साहेब विवाहित होते आणि त्यांना काही अपत्य होते, असा उल्लेख कोठेही आढळत नाही. त्यांचा शिष्य जमाल याचे नाव काही ठिकाणी आलेले आहे, मात्र त्यांच्या पत्नीचा अथवा मुलांचा उल्लेख कोठेही आलेला नाही.

sant kabir
Sant Tukaram Maharaj : तुका म्हणे धावा...पंढरी विसावा

क्षितीमोहन सेन यांच्या १९३० साली प्रकाशित झालेल्या मेडिव्हल मिस्टिसिझम ऑफ इंडिया नामक ग्रंथात केलेल्या उल्लेखानुसार कबीर साहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या नावाचा एक नवा पंथ अथवा संप्रदाय प्रारंभ करण्याची मागणी त्यांच्या अनेक शिष्यांनी कमाल साहेबांकडे केली.

असा विचार करणे म्हणजे कबीर साहेबांनी सांगितलेल्या सत्याचा गळा घोटण्यासारखे आणि त्यांचे सिद्धांत नष्ट करण्यासारखे होईल. एका अर्थानं हे कबीर साहेबांची हत्या करण्यासारखे कृत्य ठरेल, जे माझ्याकडून कदापि संभव नाही, असे कमाल साहेबांनी सांगितले.

कमाल साहेबांचा विचार ऐकून अनेक शिष्य त्यांच्या विरोधात गेले. असे विरोधात गेलेले लोक ‘बूडा बंस कबीर का, उपजिओ पूतु कमालु’ या कबीर साहेबांचा म्हणण्याचा हवाला देऊन कमाल साहेबांना नावे ठेवू लागले.

कोणत्याही महापुरुषांच्या मुलांना हे मोल चुकवावेच लागते. कारण जग त्यांचे मूल्यमापन त्यांच्या पित्याच्या कर्तबगारीवर करत असते. मुलांना मात्र पित्याचे आदर्श सोडता येत नाहीत आणि स्वतःचे नवीन आदर्शदेखील निर्माण करता येत नाही.

कबीर साहेबांचे पुत्र म्हणून कमाल साहेबांनादेखील हे मोल चुकवावे लागले. कदाचित त्यामुळे कमाल साहेब नंतरच्या कबीर पंथीयांच्या परंपरेत धूसर होत गेले असावेत.

याचाच परिणाम म्हणजे त्यांची समाधी कडा मानिकपूरला आहे की झूँसीजवळ कोणत्या स्थानी आहे की मगहर येथे कबीर साहेबांच्या शेजारी आहे. याविषयी अभ्यासकांमध्ये आजही एकवाक्यता नाही.

कमाल साहेबांच्या विचारधारेचा मूळ स्रोत कबीर साहेब होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्या पित्याप्रमाणेच त्यांनी बाह्य साधनांपेक्षा निर्मळ हृदयाला भक्ती मार्गात महत्त्वाचे मानले आहे.

तसेच अंतर्मनात शोध घेण्याऐवजी मृगजळामागे भटकणाऱ्याचा भ्रम दूर व्हावा यासाठी ते प्रयत्नशील दिसतात. अन्य सगळ्या साधनांपेक्षा रामनामाच्या जपाला कमाल साहेबांनी महत्त्व दिलेले आहे. वारकरी संप्रदायातील नामजपाचा प्रभाव त्यांच्या ठायी दिसून येतो.

राजा आणि रंकाला समान लेखणारे आणि बाह्य व अंतर जगात एक ज्योती अनुभवणारे कमाल साहेब म्हणतात ‘अंतर भीतर भई भरपूर, देखूं सब ही उजाला’.

कबीर साहेबांच्या वाणीतील परखडपणा आणि गोडवा ह्या दोन्ही गुणांची प्रचिती कमाल साहेबांच्या वाणीत दिसते. अहंकाराऐवजी विनम्रतापूर्वक आर्जव आणि समानतेचा आग्रह दिसून येतो.

राज रंक दोंनो बराबर, जैसे गंगाजल पानी ।

मान करो कोई भूपर मारो, दोनों मीठा बानी ।

-----------------------

sant kabir
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com