प्रतिनिधी
कोणकोणत्या जातींचे मासे एकत्र ठेवावेत, एका टँकमध्ये किती मासे असावेत, यावर काही बंधने असतात. प्रत्येक जातीच्या माशांची वयोमर्यादादेखील वेगळी असते. काही मासे चार-पाच महिने, तर काही मासे वीस-पंचवीस वर्षेदेखील जगू शकतात.
माशांबद्दल नेहमीच सर्वांना कुतूहल असते. मत्स्यालयाचा छंद आणि घरी काचेच्या पेटीत मासे ठेवण्याची पद्धत मुख्यत्वे पाश्चिमात्य आहे. ब्रिटिश भारतात आल्यानंतर आपल्याकडे माशांकडे ‘पाळीव प्राणी’ म्हणून बघितले जाऊ लागले. मत्स्यपालनाचा छंद जोपासणाऱ्यांचे किंवा मत्सपालनाची आवड असणाऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढल्याचे दिसून येत आहे.
भारतीय माशांच्या २०० पेक्षा अधिक निरनिराळ्या जाती शोभिवंत मासे म्हणून किंवा घरी पाळण्यासाठी उत्तम आहेत. पहिल्यांदा मासे पाळत असताना अनेक प्रश्न मनात असतात; अगदी कुठला मासा आणावा, कोणता फिश टँक घ्यावा, इथपासून ते त्यांची काळजी, खाद्य आणि संबंधित इतर गोष्टी याबाद्दल अनेक शंका असतात. त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ या.
मासा पाळीव म्हणून लोकप्रिय झाला, यामागे अनेक कारणे आहेत. मासे शांत असतात, ते आवाज करीत नाहीत. पाण्यात होणारी त्यांची हालचाल बघून मन शांत होते. त्यांची काळजी घेणे, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे या गोष्टींसाठी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत खूप कमी वेळ द्यावा लागतो. घरातला फिश टँक कोणत्याही कोपऱ्यात असला तरी तो सुंदरच दिसतो.
फिश टँकमुळे त्या जागेला शोभाही येते. त्यांना बाहेर फिरायला नेण्याची, त्यांच्यासोबत खेळण्याची गरज नसते. तुम्ही त्यांना घरात एकटे ठेवूनदेखील जाऊ शकतात. मासा अतिशय स्वच्छ असतो. तुम्हाला रोज त्यांची किंवा फिश टँकची स्वच्छता करायची गरज नसते. अनेक विविध रंगांचे आणि जातींचे मासे तुम्ही सहज एकत्रित पाळू शकता.