डॉ. सदानंद मोरे
सोरोसची भूमिका समजून सांगायची आवश्यकता आहे. जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होते तोपर्यंत सोरोस अर्थातच रशियाविरोधक व अमेरिकेचा पक्षधर होता. पुढे रशियाचेच विघटन झाले. मात्र साम्यवादाच्या प्रणालीचा त्याग केलेला असूनसुद्धा पुतिनच्या राजवटीत रशिया एकाधिकारशाहीला सोडायला तयार नाही असे आढळून आल्यावर सोरोसने रशियाला विरोध करणे ओघानेच आले.
एरवी रशियाने खुल्या समाजरचनेचा अंगीकार करावा म्हणून आर्थिक साहाय्य करायला निघालेला सोरोस, रशिया तसे करीत नाही हे लक्षात आल्यावर दुसरे तरी काय करणार?
जगाच्या पाठीवर जास्तीत कोणत्या वर्गातील व्यक्ती जास्त चर्चेत असतात असा प्रश्न विचारला, तर राजकीय नेते अर्थात सत्ताधीश हे उत्तर येण्याची शक्यता सर्वांत अधिक. साहित्यिक, वैज्ञानिक, खेळाडू, अभिनेते, तत्त्वज्ञ, उद्योगपती असे अनेक लोक आपापल्या क्षेत्रात काम करीत असतात. त्यांचे योगदान कमी असते असे म्हणायचे धाडस कोणीच करणार नाही.
वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांमुळे तर मानवजातीचा इतिहास बदलून गेला असल्याचे दिसून येते. मग सत्ताधीशांचाच एवढा बडेजाव आणि बोलबाला का, तर त्यांचे निर्णय आणि कृती समाजाच्या वर्तमानावर थेट प्रभाव पाडत असतात. त्यांचे निर्णय आणि कृती यामुळे उलथापालथ होऊ शकते.