

Rainy Season Emotions
esakal
राधिका परांजपे-खाडिलकर
लोक म्हणतात, पाऊस माणसाला भूतकाळात घेऊन जातो, जुन्या आठवणी जागवतो. माझ्या बाबतीतही ते खरंच आहे; फक्त माझ्या आठवणींमध्ये एखादी पावसाळी डेट, एका छत्रीतला वॉक असं काहीही नसून, बसमध्ये चढताना घसरलेला पाय, उलटलेली छत्री, फुललेले केस आणि लहानपणी चिखलात माखलेले मोजेच आहेत. गांडुळ कसं पावसाळ्यात जमिनीबाहेर पडतं, तशा या आठवणी दर पावसाळ्यात डोकं वर काढतात.
वाफाळत्या बिर्याणीचा पहिला घास घेताना दाताखाली कचकन वेलचीचा तुकडा येणं, आधीच उशीर झालेला असताना दाराच्या हँडलमध्ये कुर्त्याची बाही अडकून ती टर्रकन फाटणं, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना पायाचं शेवटचं बोट टेबलाच्या कोपराला धडकणं, नखं कापताना चुकून जिव्हाळं कापलं जाणं आणि ते आठवडाभर हुळहुळत राहणं, चहाच्या नावाखाली कोणीतरी रोझ जिंजर टी नावाचं थोतांड आणून देणं या सगळ्या गोष्टी कशा छान मूडचा क्षणार्धात विचका करतात ना, तसाच विचका पाऊस करतो माझ्या दिवसाचा...! पाऊस तर जाऊ दे, पावसाची नुसती चाहूलही मला इतक्याच तीव्रतेनं अस्वस्थ करते. मे महिन्याच्या शेवटालाच एखाद्या दिवशी या अस्वस्थतेची चाहूल लागते. खरंतर त्या दिवसाची सुरुवात छान झालेली असते. स्वयंपाक वेळेत आवरलेला असतो, ऑफिसचं कामही बऱ्यापैकी निवांत असतं. रोजच्या मानानं एकंदर दिवस जरा जास्त चांगला सुरू असतो. आणि तेवढ्यात भर दुपारी केव्हातरी मधेच ऊन नाहीसं होतं आणि डेस्कवरून खिडकीबाहेर बघितल्यावर काळ्या ढगांची गर्दी होताना दिसू लागते. चांगली सुरुवात झालेल्या दिवसाचा शेवट काही फार चांगला होणार नाही, याची खात्री करण्यासाठी ढग गर्दी करत असतात. पावसाचा थेंबही जमिनीवर पडायच्या आधी, माझा त्रागा सुरू होतो. पुढच्या दोन-तीन महिन्यांसाठी माझी प्रचंड भावनिक त्रेधातिरपीट होणार असल्याचा इशारा मी त्याच दिवशी आजूबाजूच्यांना देऊन ठेवते!