सौरभ महाडिक
‘घोस्ट’चे शिकारीचे फोटो काढत असताना मनात सातत्यानं एकच विचार येत होता... जंगलात जे प्रसंगावधान ठेवतात, संयम ठेवतात, तसंच जंगलावर, निसर्गावर भरभरून प्रेम करतात, जंगलात फिरताना फक्त वाघच दिसायला हवा ही भावना ठेवत नाहीत, कुठला प्राणी दिसला नाही तर अगदी जंगलातली शांतताही मनात भरून घेतात, त्यांना आणि त्यांनाच जंगल अगदी भरभरून देत असतं!
सन १९८१मध्ये मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला राहायला आलो. त्यावेळी लेपर्ड रेस्क्यू टीममध्ये काम करणाऱ्या जयंत काळे ह्यांच्याबरोबर जंगलात फिरायला लागल्यामुळे जंगलात फिरण्याची आवड निर्माण झाली. पण मी खऱ्या अर्थानं जंगलात फिरायला लागलो ते १९९६पासून... १९९६मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशातल्या बांधवगढ टायगर रिझर्व्ह इथं छायाचित्रणासाठी गेलो. तिथे आयुष्यातला पहिला वाघ अनुभवला, तो म्हणजे चार्जर... तो बांधवगढचा राजा होता!
मला त्याचे अनेक फोटो काढता आले. त्यानंतर मी दरवर्षी फोटो काढायला जंगलात जाऊ लागलो. प्रत्येक जंगलात असंख्य आगळेवेगळे अगदी मनाच्या कप्प्यात जपून ठेवता येतील असे क्षण अनुभवता आले. माझ्या या अनुभवांमुळेच मला वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार ही ओळख मिळाली. माझ्या या प्रदीर्घ जंगल भटकंतीत खऱ्या अर्थानं माझ्या मनात कायमचं रुतून बसलेलं जंगल म्हणजे राजस्थानातलं ‘रणथंभोर’...