Winter and Human Emotion
Esakal
डॉ. हेमंत बा. अय्या
हिवाळा म्हणजे केवळ थंडी नव्हे; तो माणसाला आत वळायला लावणारा ऋतू आहे. उन्हाळा बाहेर खेचतो, पावसाळा थांबवतो; पण हिवाळा विचार करायला शिकवतो. थंडी अंगात शिरते तेव्हा माणूस नकळत स्वतःच्या आत शिरतो. शब्द कमी होतात, अर्थ वाढतो. अशा दिवसांत मौनही बोलकं होतं आणि आठवणींना वर्तमानाची धार येते. कदाचित म्हणूनच हिवाळा माणसाला वेदना सहन करायला नाही, तर त्या समजून घ्यायला शिकवतो.
एरवी दोघे दोघेच भेटून तिसऱ्याच्या गोष्टी करणारे; पण शेवटी एक दिवस तिघेही एकत्र भेटलेच! कोण काय विचारता? अहो, तेच... कधीच एकमेकांना बरोबरीने न भेटणारे तिघे मित्र उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा! मग सुरू झाली तिघांतही श्रेष्ठत्वाची लढत! घामाने चिंब भिजलेल्या उन्हाळ्याने, ‘‘दादा, मलाही भिजवता येतं म्हटलं!’’ असा टोमणाच मारला पावसाळ्याला.