

American self-government and Woodrow Wilson
esakal
डॉ. सदानंद मोरे
एकविसाव्या शतकासाठी जाहीरनामा देऊ शकणारा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या वाट्याला त्या शतकाच्या सुरुवातीला आला नाही हे खरे आहे. विसाव्या शतकाचा एकूण लेखाजोखा घेतला तर तशी शक्यताही नव्हती. विल्सनच्या आदर्शवादी राजकारणापासून बाजूला जायची परंपरा त्याच्या हयातीतच तयार झाली आणि अर्थात ते जगाच्या व्यवहाराला धरून होते हा दुरावा नजरेत भरावा इतका असला, तरी खुपावा इतका नव्हता. आजच्या ट्रम्प यांच्या कारकिर्दीत तो खुपण्याइतका टोकदार होत चालला आहे, असे खेदाने म्हणावे लागते.
अमेरिकेच्या इतिहासाचा व्यासंगी अभ्यासक असलेल्या वूड्रो विल्सनला इंग्लंडच्याही इतिहासाचा तितकाच व्यासंग करावा लागला असणार हे स्पष्ट आहे. त्याला अनुसरून आपल्या व्याख्यानात त्याने इंग्लंडच्या, विशेषतः इंग्लंडच्या संसदीय इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. इंग्लंडपासून अलग होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून प्रस्थापित झालेल्या अमेरिकेचा त्यापूर्वीचा इतिहास हा अर्थातच इंग्लंडच्या इतिहासाचा एक भाग होता, ज्यात संसदीय लोकशाहीचा विकासक्रम प्रतिबिंबित झाला आहे. तो मान्य करायला विल्सनला अडचण असायचे काहीच कारण नव्हते.