

Workplace Sexual Harassment
esakal
कुठल्याही कामाच्या ठिकाणाचे मूल्य तिथल्या इमारतींवरून ठरत नाही, तिथल्या नफ्यावरून, धोरणांवरून किंवा अधिकारांवरूनही ठरत नाही. त्याचे खरे अस्तित्व तर तिथल्या प्रत्येक व्यक्तीच्या आत्मविश्वासातून दिसून येते. विश्वासाने तिथे पाऊल ठेवणाऱ्या आणि तितक्याच विश्वासाने आणि समाधानाने तिथून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरून ते अस्तित्व दिसत असते.
जरा हे डोळ्यासमोर आणून बघा... ती नेहमीसारखीच एक सोमवारची सकाळ असते. शहर पूर्णपणे जागे होण्यापूर्वीच, एक स्वच्छता कर्मचारी रस्ते झाडत असते. जाणारे-येणारे एखादे वाहन मंदावते - ट्रॅफिकमुळे नाही, तर कोणाला तरी तिच्यावर आणखी एक टिप्पणी करायची असते म्हणून...
काही गल्ल्या सोडून, घरच्या घरी पापड आणि लोणच्याचा व्यवसाय करणारी एक महिला तिच्या ऑर्डर्सची डिलिव्हरी देण्यासाठी बाहेर पडते. एक दुकानदार सूचक हसून म्हणतो, ‘पुढच्या वेळी एकटीच ये, आपण निवांत बोलू...’
एका घराची सकाळी सकाळी बेल वाजते. दिवसभरात वाजणाऱ्या असंख्य बेल्सपैकी ती पहिलीच. एक घरकाम करणारी महिला त्या घरात प्रवेश करते. ती आपले काम संपवत असतानाच, घरमालक बोलता बोलता तिच्या जरा जास्तच जवळ येऊन उभा राहतो...
शाळेच्या असेंब्लीच्या घंटेचा आवाज कॉरिडॉरभर घुमतो. एक शिक्षिका स्टाफरूममध्ये जाते, तोच तिला ऐकायला मिळते, ‘तुम्ही साडीत खूपच सुंदर दिसता हो...’ आणि तिथे एक प्रकारचा कुत्सित हशा पिकतो...
बिल्डिंगच्या शेजारच्या किराणाच्या दुकानाचे शटर उघडते. त्या दुकानात काम करणारी एक तरुण मुलगी प्रत्येक ग्राहकाचे तितक्याच सौजन्याने, उत्साहाने स्वागत करत असते. पण तिच्या त्या उत्साहवर्धक वागण्या-बोलण्यामुळे दिवसभरात कोणीतरी ‘तिला आपल्यात रस आहे’ असा गैरसमज करून घेतलेला असतो, कोणीतरी तिचा नंबर मागितलेला असतो, तर कोणीतरी दुकानाबाहेर गरजेपेक्षा जास्त घुटमळलेले असते...