

Youth Driving Social Change
esakal
विश्वजीत राळे
आजची तरुणाई केवळ सरकारी यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करत नाहीये. ती व्यवस्थेला प्रश्न विचारते आहेच, मात्र हे प्रश्न आपल्यापरीनं कशाप्रकारे सोडवता येतील यासाठी विविध प्रकारे प्रयत्नदेखील करत आहे. माहिती, तंत्रज्ञान, संशोधनाच्या मदतीनं व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी सोईस्कर करण्यासाठीही योगदान देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि भारत देशाचे आपण सारे नागरिक. आपल्याला शिकवलं जातं, की आपली ही भारतीय लोकशाही चार स्तंभांवर अवलंबून आहे - कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमं! हे जितकं खरं आहे तितकंच आणखी एक सत्य नाकारून चालणार नाही, ते म्हणजे या लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा घटक - ‘लोक’. तुम्ही त्याला ‘लोक’ म्हणा, ‘नागरिक’ म्हणा, ‘जनता’ म्हणा किंवा ‘समाज’ म्हणा... सांगण्याचा उद्देश हा, की लोकशाही तेव्हाच अबाधित राहील, हा देश तेव्हाच शाबूत राहील; जेव्हा समाज जागरूक असेल, लोकशाहीच्या चारही स्तंभांवर जनतेचा अंकुश असेल आणि या समाजातील विविध प्रश्न ओळखून ते सोडवण्याकडे केवळ प्रशासनाचाच नाही, तर समाजाचाही कल असेल!