
वरुण सुखराज
कुणाल कामराने केलेल्या एका गाण्यावर शिवसेनेने मुंबईत एका स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विडंबन आणि विनोद हे लोकशाहीतील महत्त्वाचे अस्त्र असताना, त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. एका विडंबनावरून सुरू झालेला गदारोळ वाढत असताना, सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
‘कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री द्या...’ हे वाक्य आहे महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याचे!
मी हे वाक्य जेव्हा समाजमाध्यमांवर वाचलं त्याच्याबरोबर ५ मिनिटे आधी माझा (वरील वाक्यात उल्लेख केलेल्या) कुणाल कामरा नावाच्या भयंकर कुख्यात गुन्हेगाराशी (जो मुळात एक कॉमेडियन आहे) फोनवर बोलणं झालं होतं, तो तमिळनाडूच्या एका गावातील स्टुडिओमध्ये एका शैक्षणिक विषयाचा पॉडकास्ट शूट करत होता, ज्यात मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग होता.