

School Library and Reading Culture
esakal
सुदाम कुंभार - sakal.avtaran@gmail.com
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्याची कल्पना सुंदर आहे; पण त्यांना खरी आदरांजली १५ ऑक्टोबरच्या एका दिवसापुरती मर्यादित नसून, पुढील ३६४ दिवस विद्यार्थी किती वाचतात यात आहे. शाळेच्या ग्रंथालयाचे खरे यश पुस्तकांच्या संख्येत नव्हे; तर त्यातून घडणाऱ्या वाचनप्रेमी आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांत आहे. शालेय ग्रंथालये पुस्तकांनी भरलेली बंद कपाटे न राहता खऱ्या अर्थाने जिवंत अध्ययन केंद्रे बनायला हवीत.
शाळेतील ग्रंथालय म्हटले, की डोळ्यांसमोर नेमके काय येते? पुस्तकांनी भरलेली कपाटे, त्यांना लावलेली कुलपे, नोंदवहीत व्यवस्थित नोंद केलेली पुस्तके आणि आठवड्याच्या वेळापत्रकात दाखवलेली एखादी ‘ग्रंथालय तासिका’ की हातात पुस्तक घेऊन शांतपणे वाचणारे विद्यार्थी, वाचलेल्या पुस्तकांवर मित्रांशी चर्चा करणारे गट, पुस्तकांची परीक्षणे लिहिणारी मुले, लेखक-कवींशी संवाद साधणारे विद्यार्थी, वाचन कट्टे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी जिवंत झालेले अध्ययन केंद्र? या दोन चित्रांमधील फरक केवळ ग्रंथालयाच्या रचनेचा नाही; तर वाचन संस्कृतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचाही आहे. त्यामुळेच शाळेतील ग्रंथालयाचे नेमके स्वरूप आणि त्याची भूमिका यांचा आज अधिक गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.