

Human–Machine Future
esakal
रोहित पांढारकर - saptrang@esakal.com
हळूहळू माणूस आणि मशिन यांच्यातली रेषा धूसर व्हायला लागेल. जेव्हा तुमच्या शरीरातले निम्म्याहून अधिक अवयव कृत्रिम असतील, तुमचा मेंदू सतत क्लाउडला कनेक्टेड असेल, तेव्हा तुम्ही नक्की ‘माणूस’ उराल की ‘रोबोट’ व्हाल? मानवी मर्यादा या खरं तर आपल्याला माणूस बनवतात. आपण थकतो, आपल्याला भूक लागते, आपण चुका करतो आणि आपण विसरतो, या मर्यादांमुळेच आपण नवनवीन मार्ग शोधतो. जर आपण ‘सुपर ह्युमन’ झालो, तर आपल्यातल्या संवेदना आणि भावनांचं काय होईल?
विज्ञानाच्या साहाय्यानं १५० वर्षांपर्यंतचं निरोगी आयुष्य कसं गाठता येईल, याचा आढावा गेल्या भागात आपण घेतला. जनुकीय कात्री आणि अल्फाफोल्डसारख्या ‘एआय’ मॉडेल्समुळे शरीराच्या आतल्या दुरुस्त्या तर शक्य झाल्या आहेतच; पण आता विज्ञानाची नजर शरीराच्या ‘बाहेर’ आणि थेट मेंदूच्या ‘आत’ वळली आहे. आपण फक्त दीर्घायुषी होऊन थांबणार नाही आहोत, तर आपण ‘सुपर ह्युमन्स’ किंवा ‘ऑगमेंटेड ह्युमन्स’ होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. पण या प्रक्रियेत आपण नक्की काय मिळवणार आहोत आणि काय गमावणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.