

AlphaFold Google DeepMind
esakal
पु ढच्या काही दशकांत आपल्याला आवडणाऱ्या पण मृत माणसांच्या डिजिटल प्रतिकृती निर्माण करून त्यांच्याशी आपण त्या जिवंत असल्यासाखंच संवाद साधू शकू आणि त्यांच्याबरोबर वावरूही शकू, याबद्दल कसे थक्क करणारे प्रयोग चालले आहेत, हे आपण बघितलंच. पण त्याचबरोबर आपल्याला आपला लाइफ स्पॅन वाढवता येईल का याविषयी बरंच संशोधन चालू आहे. या सगळ्या संशोधनामुळे, नवीन औषधं, नवीन चाचण्या, नवीन उपकरणं आणि शस्त्रक्रिया या सगळ्यांमुळे दरवर्षी आपलं आयुष्मान थोडं थोडं वाढतच चाललं आहे. असं करत करत एक दिवस असा येईल, की एका वर्षात वाढलेलं आयुष्मान एका वर्षापेक्षा जास्त असेल. त्या वेळेला संशोधक एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात. याचं कारण यानंतर काही माणसं तरी चक्क अमर होऊ शकतील अशी काही लोकांची कल्पना आहे.
पण ही कल्पनाभरारी आपण थोडा वेळ बाजूला ठेवली, तरी आज आयुष्मान वाढवण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या. यासाठी ज्या कल्पना वापरलेल्या आहेत किंवा ज्या थेरपीजवर काम चालू आहे त्यांच्यापैकी एपीजेनेटिक्स, पार्शल सेल रीप्रोग्रामिंग, सेल्युलर सेनेसेन्स, सेनोलायटिक्स, स्टेम सेल्स थेरेपी, टेलोमिअर वाढवणं, जीन थेरेपी या महत्त्वाच्या आहेत.