
चीन भारताला बऱ्याचदा धोका देतो, तर कधी एखादा सुखद धक्का देतो. परंतु अधिकांशवेळा भारताला आलेला अनुभव वाईटच आहे. ऑपरेशन सिंदूरमधे ‘खो’ घालावा आणि पाकिस्तानची पाठराखण व्हावी, हा चीनचा उद्देश दिसतो आहे. त्यांच्या राजनैतिक भूमिकांवरून हे स्पष्ट होते.
‘शां घाय सहकार्य संघटना’ ही दहा सदस्यदेशांची संघटना नुकतीच एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे उजेडात आली आहे. पहलगामला भारतावर झालेला दहशतवादी हल्ला व त्याचा बदला म्हणून भारताकडून झालेला ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे दक्षिण आशियातली शांतता धोक्यात आली, असा उल्लेख करणारे पत्रक चीन व रशिया यांच्या पुढाकारामुळे निघू शकले नाही, म्हणून या संघटनेच्या सदस्यराष्ट्रांच्या संरक्षणमंत्र्यांनी पत्रकावर सह्या केल्या नाहीत. तर भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख न केल्याने भारताचे संरक्षणमंत्री नाराज झाले. ही घटना आपल्यासमोर आहे.