

Sebastian Sawe London Marathon Record
esakal
केनियाचा ३१ वर्षीय धावपटू सॅबेस्टियन सावेने नुकतीच लंडन मॅरेथॉन दोन तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. असा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच धावपटू ठरला. सावेने अशी अद्वितीय कामगिरी केवळ शारीरिक क्षमतेच्या किंवा मानसिक कणखरतेच्या जोरावर केली नाही; तर त्यास अनेक शास्त्रीय बाबींची जोडसुद्धा मिळाली. साहजिकच त्याची विक्रमी कामगिरी आता वैद्यकीय, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संशोधनाचा विषय ठरेल.
रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच असतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. मात्र, काही रेकॉर्ड असे असतात की ते तोडल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. एक मैल अंतर कुणीही चार मिनिटांच्या आत धावू शकणार नाही, असा काही वर्षांपूर्वी तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, इंग्लंडचे सर रॉजर बॅनिस्टर यांनी ६ मे १९५४ रोजी सर्वप्रथम एक मैल अंतर चार मिनिटांच्या आत (३ मिनिटे ५९.४ सेकंद) पूर्ण केले त्यावेळी ती घटना विसाव्या शतकातील क्रीडा क्षेत्रातील एक प्रमुख मानली गेली. कारण कुणी धावपटू अशी कामगिरी करू शकेल यावर तज्ज्ञांचा विश्वास नव्हता. बॅनिस्टर यांच्या कामगिरीची तुलना आता लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या सॅबेस्टियन सावेने केलेल्या विश्वविक्रमाशी सुरू झाली आहे. कारण दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणे हे मानवी शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने अशक्यप्राय आहे, असे तज्ज्ञांंचे मत होते. मात्र, सावेने स्वतःच्याच शारीरिक क्षमतेला आव्हान देत आणि तिच्यावर एकप्रकारे मात करीत हे शक्य आहे, हे दाखवून दिले. सावेने तब्बल ४२ किलोमीटरचे अंतर सरासरी २ मिनिटे ५० सेकंदाच्या वेगाने धावणे म्हणजे हा विक्रम लवकरच मोडला जाईल, याची नांदीसुद्धा होय.
लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या सॅबेस्टियन सावे याने १ तास ५९ मिनिटे ३० सेकंदाचा विश्वविक्रम करून मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर मानली जाणारी दोन तासांची ‘वॉल’ अखेर मोडून काढली. समुद्रसपाटीपासून आठ हजार फुटांवर असलेल्या रिफ्ट व्हॅलीमधील इटन येथे आठवड्याला दोनशे किलोमीटरचे ‘इन्डुरन्स’ करणाऱ्या ३१ वर्षीय सावेने ही अद्वितीय कामगिरी केवळ शारीरिक क्षमतेच्या किंवा मानसिक कणखरतेच्या जोरावर केली नाही; तर त्यास अनेक शास्त्रीय बाबींची जोडसुद्धा मिळाली. त्यामुळे त्याची ही विक्रमी कामगिरी आता वैद्यकीय, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संशोधनाचा विषय ठरेल.