

Permanent Roommates Web Series Analysis
esakal
बाराएक वर्षांपूर्वी यू-ट्यूबवर ‘पर्मनंट रूममेट’ नावाची एक वेबसिरीज आली होती. मिकेश आणि तान्या या प्रेमीयुगुलाच्या नात्यातील चढ-उताराची ती गोष्ट होती. ते दोघे तीन वर्षे ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये असतात. त्यानंतर एक दिवस अचानक मिकेश तान्याला प्रत्यक्ष भेटायला भारतात येतो. सुरुवातीचा आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर त्यांना प्रत्यक्षातील संवाद आणि सोबत जगण्यातील खाचखळगे कळायला लागतात. ‘लाँग डिस्टन्स’ नात्यातून निर्माण झालेली एकमेकांविषयीची समज आणि सहजता डळमळू लागते. दुरून साजरे वाटलेले प्रेम प्रत्यक्षात निभावणे कठीण होऊ लागते. मग दोघंही ते नाते तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतात आणि त्या वळणावर वेबसिरीजचा पहिला हंगाम संपतो. त्यांच्या निर्णयामागे इतरही बरीच कारणे असतात. पण एकमेकांपासून दूर असताना झालेल्या संवादाचा अनुभव आणि प्रत्यक्षातील अनुभव यात जाणवलेली दरी हे त्याचे एक मुख्य कारण असते. दोघे प्रामाणिक असतात. पण दूरच्या संवादातून निर्माण झालेल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातील अनुभव यातील फरक काही त्यांना पचविता येत नाही. ही गोष्ट फक्त मिकेश आणि तान्याचीच नाही. किंवा फक्त प्रणयी नात्याचीही नाही. मुख्यत्त्वे माध्यमांद्वारा झालेल्या संवादातून जे निर्माण होते, अशा कोणत्याही वैयक्तिक नात्यावर मिकेश आणि तान्यासारखी स्थिती ओढवू शकते. हे फक्त निरीक्षण नाही. त्याला मानसशास्त्रीय संशोधनाचा आधारही आहे. ममत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारे आपलेपण. ही फार महत्त्वाची आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. मानसशास्त्रीय परिभाषेत त्याला ‘अटॅचमेंट’ म्हणतात.