आपल्यासमोर जलशुष्कतेचे संकट उभे आहे का? हा प्रश्न विचारला आहे अलीकडच्या एका संशोधन-अभ्यासाने. पाण्याचा, अधिक नेमकेपणाने सांगायचं तर पाणीवापराचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते जलउपलब्धतेचा विचार करता भारत एका तणावाच्या उंबरठ्यावर आहे..आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पाण्याची प्रतिव्यक्ती वार्षिक उपलब्धता १,७०० घनमीटर (m³) असणे अपेक्षित आहे. ह्या निकषानुसार जागतिक क्रमवारीत भारत सध्या १८२व्या क्रमांकावर आहे. पाण्याची ही उपलब्धता लक्षात घेता आपल्याला भविष्यात ‘पाणीबाणी’ला तोंड द्यावे लागण्याची शक्यता ठळकपणे सामोरी येते. केंद्र सरकारच्या भारत जलसंपदा माहिती प्रणालीनुसार, १९५० ते २०२४ या कालावधीत, देशात प्रतिव्यक्ती जलउपलब्धतेत ७३ टक्क्यांची घट झाली आहे. जर या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, तर भारत ‘पाणीटंचाईग्रस्त’ होऊ शकतो.डाउन टू अर्थ हे पर्यावरणाला वाहिलेले पाक्षिक प्रसिद्ध करणाऱ्या सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या संस्थेतील संशोधक फराझ अहमद आणि सुनिता सिंघल यांच्या मते, विशेषतः शहरी-निमशहरी भारताने सांडपाण्याच्या पुनर्वापराकडे प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. हे सांगणारा ‘वेस्ट टू वर्थ : मॅनेजिंग इंडियाज् अर्बन वॉटर क्रायसिस थ्रू वेस्टवॉटर रियूज’ हा त्यांचा संशोधन-अभ्यास महाराष्ट्रासह सात राज्यांमधील सांडपाणी व्यवस्थापनाच्या अभ्यासावर आधारलेला आहे..गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्म्याबरोबरच देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही विविध भागांतून पाण्याच्या पातळ्या खालावत चालल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. बंगळूरसारख्या एका राज्याच्या राजधानीच्या शहराला एका अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या विस्तारणाऱ्या शहरांमधले नव्याने विकसित होणारे अनेक नागरी भाग, या शहरांच्या आधाराने वाढणारी अनेक लहान आणि मध्यम आकाराची गावे, त्यांच्या भवतालातील कृषिपट्टे आणि उद्योगही अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत. शहरीकरणाचा रेटा झपाट्याने वाढत असताना, शहरीकरणाच्या नियोजनाचे मुद्दे जटिल होत असताना पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती भविष्यात आणखी बिकट होईल, अशी भीती अभ्यासकांना वाटते. विशेषतः हवामान बदलामुळे पाऊसचक्राचे तानमान बिनसत चाललेले असताना, त्यातून निर्माण होणारे पूर आणि दुष्काळ पाण्याच्या उपलब्धतेचे तणाव निर्माण करीत असताना..प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरामुळे दोन महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या दिशेला जाता येईल. एक म्हणजे शहरांच्या वाढत्या पाणीमागण्या, पाणीटंचाई अधिक सक्षमपणे हाताळता येईल आणि दुसरीकडे सांडपाण्याच्या सुरक्षित विल्हेवाटीची समस्या सोडवताना, तळी, नद्या-नाले, समुद्रांच्या प्रदूषणाचा प्रश्नही हाताळता येईल.वापरलेला पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे सांडपाणी ही व्याख्या मान्य केली, तर शहरी भारतात दररोज ७२,३६८ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. हा अंदाज आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा. यातल्या फक्त २८ टक्के पाण्यावर प्रक्रिया होते (म्हणजे ७२ टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता तसेच नद्यांमध्ये वगैरे सोडले जाते किंवा जमिनींवर पसरून राहते). लक्षात घेण्याजोगा भाग म्हणजे प्रक्रिया झालेल्या २८ टक्के सांडपाण्यापैकी फक्त ३ टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनही सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे ‘पुनर्वापरा’ऐवजी प्रामुख्याने ‘विल्हेवाट’ या दृष्टिकोनातून पाहिले जाते..सीएसईच्या अभ्यासकांच्या मते शहरी लोकसंख्येचे पुढच्या पंचवीस वर्षांचे अंदाज पाहता सांडपाणी निर्मिती ७५ ते ८० टक्क्यांनी वाढेल. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची आपल्या शहरांची सध्याची जी क्षमता आहे त्याच्या तुलनेत ही वाढ साडेतीन पटीने जास्त आहे. ही बाब सांडपाणी संकलन, प्रक्रिया आणि पुनर्वापरासाठी मजबूत यंत्रणा निर्माण करण्याची गरज अधोरेखित करते.शहरांत निर्माण होणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी किमान २० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा अशी केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाची अपेक्षा आहे. मात्र अजूनही अनेक राज्यांमधील अनेक शहरांची या बाबतीतील कामगिरी फारशी समाधानकारक नाही, असे उपलब्ध आकडेवारी सांगते..Premium| Devrai: देवराई संकल्पना, पर्यावरण रक्षणाचे प्राचीन मार्ग.योग्य प्रक्रिया केलेले सांडपाणी शेती, सार्वजनिक किंवा मोठ्या गृहसंकुलांमधल्या बागा, गोल्फ कोर्स, औद्योगिक प्रक्रिया, धूळ नियंत्रण, अग्निशमन, शहरांमधले कृत्रिम तलाव आणि अगदी भूजल पुनर्भरणासारख्या ‘अपेय’ कारणांसाठी वापरले जाऊ शकते. यामुळे या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या गोड्या पाण्याच्या संसाधनांवरचा ताण कमी होऊ शकेल.जवळजवळ वाळवंटी असणारे इस्राईल, कुवेतसारखे देश आणि पाणीपुरवठ्यासाठी शेजारच्या मलेशियावर अवलंबून असणारा सिंगापूर तसेच ग्रीस, इटली आणि अनेक आफ्रिकी राष्ट्रांसह जगभरातले अनेक देश सांडपाण्याचा पुनर्वापर अत्यंत उत्तम पद्धतीने करत आहेत. स्पेनमधल्या बार्सिलोना या छोट्याशा शहरातली सार्वजनिक वाहतूक सांभाळणारी कंपनी सांडपाण्यापासून मिळणाऱ्या जैववायूवर बसगाड्या चालवण्याचा प्रयत्न करते आहे..Premium| E-Shram Portal: कामगारनोंदणी ते सामाजिक सुरक्षा.आपल्यालाही नजीकच्या भविष्यात सांडपाण्यातल्या या संपत्तीचा वेध घ्यावा लागेल. सुरुवात कदाचित सांडपाण्याबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यापासून करावी लागेल. भविष्यातील पाणीबाणी टळून आपल्या पुढच्या पिढ्यांचे जीवन वाहते राहावे यासाठी नव्याने जलसूक्ते लिहिताना या संपत्तीचा शोधही नव्या सजगतेने घ्यावा लागेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.