

Shahaji Raje Bhosale History
esakal
अनिकेत यादव- इतिहास अभ्यासक
शाहजीराजांचा बीमोड करून निजामशाही सल्तनतीचा उरलासुरलेला भाग स्वतः जिंकण्याची इच्छा मनी बाळगून मुघल बादशाह शाहजहान २० सप्टेंबर १६३५ रोजी आग्य्राहून दख्खनेत यायला निघाला. आदिलशाह व कुत्बशाह यांना कडक फर्मान पाठविण्यात आले. शाहजहानच्या नुसत्या फर्मानानेच कुत्बशाह वठणीवर आला. निजामशाही प्रांत घेण्याकरिता मुघल सरदारांना रवाना करण्यात आले. मुघल सरदार खान जमानने मार्च-जून १६३६मध्ये शाहजीराजांच्या ताब्यातील चांभारगोंदे (श्रीगोंदा) किल्ला जिंकून घेतला, कोल्हापूरचा कोट घेतला, मिरज व रायबाग लुटले. मुघलांच्या तुलनेत शाहजीराजांचे सैन्य कमी असल्याने गनिमी काव्याद्वारे लपूनछपून हल्ले करण्याचे सत्र त्यांनी सुरू ठेवले होते. इकडे शायिस्ताखानाच्या मुघल सैन्यातील अल्लाहवीर्दीखानाने शाहजीराजांच्या ताब्यातील धोडप व चांदवडच्या परिसरातील किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला. १४ मार्च १६३६ रोजी चांदवड; १७ मार्च रोजी इंद्राई; १९ मार्च रोजी कांचना-मांचना; १९ जून रोजी धोडप हे किल्ले मुघलांनी जिंकून घेतले. याशिवाय रवळा, जवळा, अहिवंत, कोल (कोळदेहेर), योसरा (राजदेहेर), कण्हेरा, मार्कंडा, अचलगड, रामसेज, अंकाई, टंकाई, एडका (?), पेडका हे किल्लेही जिंकून घेतले. शायिस्ताखानाच्या सैन्याने मार्च १६३६मध्ये खेरदुर्ग (सागरगड, जि. रायगड) व सभोवतालचा प्रांत जिंकून घेतला. संगमनेर व जुन्नरचा १७ परगणे असलेला व वार्षिक साडेसहा लाख रुपये महसूल असलेला प्रांत संभाजीराजांकडून (शाहजीपुत्र) जिंकून घेतला.