

Shiva Kashid Sacrifice History
esakal
१३ जुलै १६६०ची रात्र! अवघ्या ६०० निवडक मावळ्यांनिशी राजे पन्हाळ्याहून वेगाने निघाले. २ पालख्या सोबत होत्या, एकात राजे स्वतः तर एकात राजांप्रमाणे हुबेहूब पोशाख केलेले शिवा काशीद बसले होते. राजांनी मांडलेला हा डाव शत्रूच्याच काय तर सोबतच्या मावळ्यांनाही चक्रावून सोडणारा होता. शत्रूची दिशाभूल करून राजगडाकडे सुरक्षित पोहोचण्यासाठी त्यांनी हा डाव आखला होता.
पन्हाळ्याहून बाहेर पडताच मोजक्या धारकऱ्यांना घेऊन शिवा काशीद यांनी मलकापुराच्या दिशेला जायचे आणि काही संकट न आल्यास गजापूरला मुख्य तुकडीला येऊन मिळायचे होते. राजांच्या तुकडीने म्हसाई पठार उतरून डोंगरधारेने व घनदाट जंगलवाटेने गजापूरच्या मार्गे खेळण्यावर (विशाळगड) पोहोचायचे. त्यानंतर सर्वांना एकत्र करून त्वरेने राजगडाकडे निघायचे. परंतु काही लोकांचा जमाव म्हसाई पठारावरून जात असल्याचे आदिलशाही हेरांनी पाहिले आणि त्यांनी तात्काळ सिद्दी जौहरला (सलाबतखान) याची माहिती दिली. जौहरने त्वरेने आपला जावई सिद्दी मसूद यासोबत १००० पायदळ आणि २००० घोडेस्वार देऊन त्यांच्या पाठलागावर पाठवले. सिद्दी मसूदने ऑक्टोबर १६५३मध्ये कावेरीपट्टणच्या लढाईत विजयनगरचा शेवटचा सम्राट श्रीरंग रायल याचा सेनापती दासराज याला ठार मारून मोठे शौर्य गाजविले होते. तेव्हा आदिलशाहाने त्याला ‘मस्ऊदखान’ असा किताब दिला होता. अशा आपल्या पराक्रमी जावयाला सिद्दी जौहरने मराठ्यांचा सोक्षमोक्ष लावण्याची कामगिरी सोपविली.