
शिव हे एक तत्त्व आहे. ते विश्वाचे साररूप आहे. शिवतत्त्व संपूर्ण आकाश व्यापते. पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू ही चारही तत्त्वे ज्याप्रमाणे आकाश तत्त्वात आहेत, तद्वत शिवही सर्वकाही सामावून घेणाऱ्या आकाश तत्त्वाप्रमाणेच आहेत. म्हणूनच शिवांना निळ्या रंगात दर्शवले जाते. अगदी अबोध बालकालाही समजू शकेल असे हे प्रतीक आहे.
शिवांचे कोणतेही एक रूप नाही. म्हणून शिवांच्या मूर्तीची नव्हे, तर शिवलिंगाची पूजा होते. शिव म्हणजे हिमालयात हजारो वर्षे ध्यान करणारे कोणी एक व्यक्तीरूप नाही, हे आपण समजून घ्यायला हवे. शिवतत्त्व अरूप आहे. शिवांचा प्रकृतीशी विवाह झाला आहे, असे म्हटले जाते म्हणजे प्रकृती शिवतत्त्वातच राहते आणि आपण प्रकृतीमार्गाने शिवतत्त्वाचा अनुभव घेऊ शकतो.