

Chh. Shivaji Maharaj Agra Escape
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
शिवाजीराजे व औरंगजेब यांची १२ मे १६६६ रोजी पहिली आणि शेवटची भेट झाली. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी राजे आग्य्रातून बाहेर पडले आणि २० नोव्हेंबर १६६६च्या सुमारास स्वराज्यात परतले. आग्र्याहून सुखरूपपणे परत आल्यामुळे राजांच्या दुसऱ्या देदीप्यमान कारकीर्दीस सुरुवात झाली. काही काळ विश्रांती घेऊन राजांनी मुघलांशी सलोख्याची बोलणी सुरू केली तर अन्य शत्रूंना वठणीवर आणण्यासाठी कंबर कसली.
शिवाजीराजे दख्खनेत आल्यानंतर येथील राजकारण पूर्णपणे बदललेले होते. मुघलांशी भविष्यात दीर्घकालीन व निर्णायक संघर्ष सुरू करण्यापूर्वी स्वराज्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर जुळवाजुळव करणे आवश्यक होते. या साधनसंपत्तीच्या संचयनासाठी आणि लष्कराला बळकट करण्यासाठी राजांना थोडा वेळ हवा होता आणि त्यासाठी स्वराज्याच्या सीमेवर शांतता असणे आवश्यक होते. दख्खनेतील राज्यकर्त्यांशी जुळवून घ्यायचे असल्याने राजांनी आपले लष्करी व राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली.