
सशक्त आणि गतिशील आरमारी कार्यक्रम
सूरत लुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी सशक्त आणि गतिमान आरमारी कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली. याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन इंग्रजी आणि डच कागदपत्रांत आढळतो. इंग्रज सूरत कौन्सिलाने कारवारास पाठविलेल्या २६ जून, १६६४ या तारखेच्या पत्रात नमूद केले आहे, ‘‘शिवाजी काही जहाजांची दुरुस्ती करीत असून काही नव्याने बांधीत आहे, एकूण साठ फ्रिगेट्स तयार केली जात आहेत.’’
चौल येथील पोर्तुगीज कप्तान जोआओ बोर्जेस दा सिल्व्हा यानेही वायसरॉयला कळवले होते, शिवाजी सुमारे पन्नास युद्धनौका बांधीत आहेत. त्यापैकी सात नौका चौल येथे पूर्ण झाल्या असून त्या लवकरच समुद्रामार्गे रवाना केल्या जाणार आहेत. या हालचाली रोखाव्यात का, असा प्रश्न त्याने उपस्थित करून चौल किल्ल्यात मनुष्यबळ अपुरे असल्याने अधिक सैन्य पाठविण्याची आवश्यकताही व्यक्त केली.
आरमारी विस्ताराच्या या हालचालींमुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली. काहींनी असे अनुमान लावले की, शिवाजी महाराज आपल्या आरमाराचा वापर करून मोका, बसरा आणि पर्शियातून येणाऱ्या जहाजांवर हल्ले करतील. तर काहींनी असे गृहित धरले की, ते साबरमती नदीमार्गे आरमार पाठवून अहमदाबादेवर चाल करणार. डच लोकांच्याही कानावर अशी एक अफवा आली होती की, शिवाजी महाराज समुद्रामार्गे सूरतेवर हल्ला करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर, १६६४ रोजी पोर्तुगीज आरमारप्रमुख डॉम मॅन्युएल लोबो दि सिल्वेरा याने गंगोळी येथून वायसरॉयला लिहिलेल्या पत्रात नमूद केले, मिर्जन, अंकोळा, शिवेश्वर आणि कारवारापर्यंतच्या परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले होते, कारण अफवा पसरल्या होत्या शिवाजी महाराज त्या भागांवर आक्रमण करणार आहेत.