
शिवाजी महाराजांची प्रशासक म्हणून जी महानता आहे त्याविषयी डॉ. सुरेंद्रनाथ सेन असे नमूद करतात : ‘‘लष्करी नेतृत्वात त्यांची महानता कधीही शंकास्पद ठरलेली नाही; परंतु नागरी प्रशासनातील त्यांची महानता तर अधिकच निर्विवाद आहे.’’ सुसंस्कृत राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्याचा खरा पाया म्हणजे सक्षम शासन आणि प्रजाजनांची आपुलकी. शिवाजी महाराजांना हा सिद्धांत अचूकपणे समजला होता.
अष्टप्रधान मंडळ
एकतंत्री कारभार आपल्या पूर्वजांनीही मान्य केलेला नाही आणि आपणासही उपयुक्त नाही. ही गोष्ट समजून घेऊन शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केले. अष्टप्रधानांची फारसीतून असणारी नावे बदलून राज्याभिषेकापासून ती संस्कृतमध्ये ठेवली. २१ जून, १६७४ रोजी अष्टप्रधानांचे अधिकार-जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे सांगणारा कानुजाबता प्रसिद्ध केला, त्यामध्ये पुढील माहिती आली आहे.
१. पेशवा किंवा मुख्य प्रधान : यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रावर शिक्के करावेत. सेना घेऊन युद्ध करावे. जिंकलेल्या प्रदेशाचा बंदोबस्त करावा.
२. मुजुमदार किंवा अमात्य : यांनी राज्यातील जमाखर्च लिहावा. फडणीसी, चिटणीसी पत्रांवर निशाण करावे. जिंकलेला प्रदेश जतन करावा. युद्ध करावे.
३. सुरनीस किंवा सचिव : सचिवांनी राजपत्रे लिहावी. लिखाणात काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्यात. पत्रावर शेरे मारावेत. महाल आणि परगण्यांचा जमाखर्च ठेवावा.
४. वाकनीस किंवा मंत्री : मंत्री यांनी राजाचे दैनंदिन कामकाज पाहावे. दरबारात घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे. राजपत्रांवर संमत चिन्ह करावे. राज्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना निमंत्रण पाठवावे.
५. डबीर किंवा सुमंत : सुमंत यांनी परराज्यसंबंधातील विचार करावा. परराज्यातील वकील येतील त्यांचा सत्कार करावा.
६. सरनोबत किंवा सेनापती : सेनापती यांनी सर्व सेना घेऊन युद्ध करावे. राज्याचे संरक्षण करावे. राज्य संपादन झाल्यानंतर त्याचे रक्षण करून हिशेब ठेवावा. सर्व फौजेच्या सरदारांना बरोबर घेऊन चालावे.
७. पंडितराव : यांनी सर्व धर्माधिकार पाहून शिक्षा करावी. शिष्टांचे सत्कार करावेत. आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त पत्रे होतील त्यावर संमत चिन्ह करावे. दान, प्रसंग, शांतिअनुष्ठान करावे.
८. न्यायाधीश : यांनी राज्यात घडणाऱ्या घटना पाहून धर्माने न्याय करावा. न्यायाची निवाडापत्रे यांवरती संमतचिन्ह करावे.