

Chh. Shivaji Maharaj Karnataka Campaig
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
कर्नाटक मोहिमेदरम्यान राजांनी गुलामांच्या व्यापारावर बंदी घालत जिंकलेल्या प्रदेशाची कडेकोट व्यवस्था लावली. एकोजींचा पराभव करत त्यांना मैत्रीपूर्ण तहासाठी भाग पाडले. परतीच्या प्रवासात गदग-हुबळी प्रांत जिंकत राजांनी बेलवडीच्या मल्लव्वा देसाई हिचा सन्मान केला. दरम्यान शिवसैन्याने नाशिक, बिदर, पैठणची मुघली ठाणी लुटली आणि वेलोरचा किल्लाही जिंकला. या दिग्विजयाने दमणगंगा ते कावेरी असा सुमारे दीड लाख चौ.कि.मी. स्वराज्याचा विस्तार झाला.
राजांनी कर्नाटक प्रांत पादाक्रांत केल्याच्या बातम्यांनी मुघल गोटात अस्वस्थता पसरली. राजांसोबतचा तह व कोसळणारा पाऊस यामुळे स्वराज्यावर चाल करणे शक्य नसल्याने मुघलांनी फितुरीचे जाळे टाकून ७ जुलै १६७७ रोजी गुलबर्गा तर ऑगस्ट १६७७मध्ये नळदुर्ग हे आदिलशाही किल्ले बळकावले. याचा उलटा परिणाम होऊन, राजांना दक्षिणेत मोकळीक दिल्याबद्दल औरंगजेबाने बहादूरखानाला दरबारात बोलावून कडक शिक्षा ठोठावली. यामुळे दख्खनची सूत्रे हाती आलेला दिलेर व विजापूरचा सरदार बहलोल या दोन पठाणांनी सर्वप्रथम कुत्बशाहाविरुद्ध युद्ध पुकारले. ‘मालखेड’ येथून १५ सप्टेंबरच्या सुमारास या युद्धास सुरुवात झाली. पुढे अनिर्णायक युद्धानंतर मुघल-आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याला नळदुर्गापर्यंत नामुष्कीची माघार घ्यावी लागली. यानंतर आपसांतील यादवीच आदिलशाहीचे महत्त्व कमी करत असल्याची जाणीव विजापुरी मुत्सद्दींना झाली. अखेर दख्खनी गटाचा म्होरक्या सिद्दी मसूद (सिद्दी जौहरचा जावई) याच्या पुढाकाराने व कुत्बशाहाच्या मध्यस्थीने सल्तनतीचे वजीरपद दख्खनी गटाकडे, तर लष्कराचे नेतृत्व पठाणी गटाकडे सोपवण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र हा करार अंमलात येण्यापूर्वीच २३ डिसेंबर रोजी पठाणी गटप्रमुख बहलोलखान मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर दख्खनी गटाचे पारडे जड होऊन विजापूरचा किल्ला व सर्व कारभार सिद्दी मसूदच्या हाती एकवटला.