

Chhatrapati Shivaji Maharaj vs Mughals
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
राजांनी जानेवारी १६५६मध्ये जुन्नरवर छापे टाकून बलाढ्य मुघलांविरुद्धच्या संघर्षाचा श्रीगणेशा केला होता. कोकण जिंकण्यासाठी आलेल्या शायिस्ताखानाशी १६६०-६३मध्ये त्यांनी लढा दिला. जयसिंहाशी १६६५मध्ये तह करून २३ किल्ले व ४ लाख होनांचा प्रदेश मुघलांना दिला. आग्रा प्रकरणानंतर एप्रिल १६६७ पासून त्यांच्याशी काही काळ सलोखा ठेवला आणि सर्व जय्यत तयारी करून नोव्हेंबर १६६९ पासून मुघलांविरुद्ध प्रदीर्घ आणि निर्णायक युद्धाचे रणशिंग फुंकले!
औरंगजेबाचा धर्मच्छळ ः मुघलांच्या जुलमी कारभारामुळे अनेकदा जनता बंड करीत असे. मात्र ती क्रूरपणे चिरडली जात असत. औरंगजेब गादीवर विराजमान झाल्यानंतर यात धार्मिक कट्टरतेची भर पडली. त्याने २८ फेब्रुवारी १६५९ रोजी एका फर्मानाद्वारे आदेश दिला की, ‘नवीन मंदिरे बांधण्यास परवानगी देऊ नये, परंतु अस्तित्वात असलेली मंदिरेही पाडू नयेत’. पुढे दहाच वर्षांत त्याचा धर्मांधपणा अधिकच वाढला. स्वतःच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी, ८ एप्रिल १६६९ रोजी त्याने आपल्या अधिकाऱ्यांना गैरमुस्लिमांच्या शाळा (धार्मिक शिक्षण देणाऱ्या) व मंदिरे पाडून टाकण्याचा आदेश दिला. (मासिर-इ-आलिमगिरी, पृ.५१-५२). त्यानंतर लगेचच (सप्टेंबर १६६९च्या सुमारास) मुघल सुभेदारांनी काशी व इतर ठिकाणी धर्मच्छळास व देवालये पाडण्यास वेगाने सुरुवात केली. (जेधे शकावली; प.सा.सं.१२८१).