
तापी नदीच्या मुखाशी समुद्रापासून २० कि.मी. आतमध्ये दक्षिण किनाऱ्यावर सुरत हे शहर वसले असून विरुद्ध दिशेला स्वाली हे बंदर होते. पौर्वात्य जगतातील ही सर्वांत मोठी बाजारपेठ मुघल सल्तनतीचे मौल्यवान रत्न होती. मोठी जहाजे ही शहरापर्यंत जात नसत, ती स्वाली येथे थांबत, तेथेच माल उतरवीत आणि चढवीत.
नदीच्या दक्षिण काठावर असणाऱ्या किल्ल्याभोवती सुरत शहराने आपले पंख पसरले होते. चौकोनी संरचनेचा असणारा सुरतेचा किल्ला फारसा बळकट नव्हता. त्याच्या चार कोपऱ्यात बुरूज होते; परंतु तोफा ठेवण्यासाठी तटबंदीवर कोणतेही चबुतरे नव्हते. लाकडी चबुतऱ्यांवर तोफा बसविण्यात आल्या होत्या. किल्ल्याच्या तीन बाजूंनी अरुंद परंतु खोल खंदक तर एका बाजूला नैसर्गिक संरक्षण करणारी नदी होती. पश्चिमेकडील तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करीत. किल्ल्याचा किल्लेदार आणि शहराचा फौजदार निराळा होता.
सुरत शहर मुघल तिजोरीत दरवर्षी आयात-निर्यात कराच्या रूपाने बारा लाख रुपयांची भर घालीत होते. सुरतेची लोकसंख्या एक लाखाहून जास्त होती. हिंदूंव्यतिरिक्त मुस्लिम, पारशी तसेच इंग्रज, डच, पोर्तुगीज, तुर्क, आर्मेनियन, अरबी, यहुदी अशा विविध धर्मांचे आणि देशांचे व्यापारी येथे वास्तव्यास होते. विरजी वोरा (हिंदू) आणि हाजी जहिद बेग (मुस्लिम) हे शहरातील प्रमुख व्यापारी होते. विरजी वोरा जगातील सर्वांत श्रीमंत व्यापारी मानला जात होता आणि त्याची एकूण संपत्ती आठ लक्ष रुपये होती.