
आग्र्यापासून भीमा नदीपर्यंत मुघलांचा मुलूख होता. जवळजवळ चार-पाचशे लोक, खासे मुत्सद्दी, स्वतः महाराज आणि संभाजी राजे असे सर्वजण प्राण वाचवून परत आले, तेही औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या काळकोठडीतून. जगातील ही सर्वांत यशस्वी आणि महान अशी सुटका आहे. शिवाजी महाराज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, २० नोव्हेंबर, १६६६ रोजी राजगडावर येऊन पोहोचले. या आनंदप्रीत्यर्थ सर्व गडांवरून तोफांचे आवाज दणाणले. काही दिवसांनी संभाजी राजेही राजगडावर येऊन दाखल झाले.
शिवाजी महाराजांची अग्निपरीक्षा
शिवाजी महाराजांविषयी द्वेष बाळगणारे अनेक उमराव औरंगजेबाच्या मनात विष कालवू लागले. १६ मे, १६६६च्या राजस्थानी पत्रात असे नमूद केले आहे की, त्याची मोठी बहिण जहांआरा, जाफरखान आणि जसवंतसिंह यांनी त्यास विचारले, ‘‘शिवाजीचा उद्धट आणि अवमानकारक स्वभाव असूनही आपल्याकडून दुर्लक्ष होत आहे. हे वृत्त देशोदेशी पसरले तर इतर भूमिये देखील येथे येऊन असेच वागतील. मग शिस्त कशी राहील? शिवाजी कोण, जो आपल्या दरबारात येऊन असा उद्धटपणा करतो आणि तरी आपण दुर्लक्ष करता? यामुळे इतर हिंदू भूमियेही असेच धाडस करतील. मग रीत आणि शिस्त राहणार नाही.’’ या विचारविनिमयानंतर औरंगजेबाने आपल्या सल्लागारांशी सल्लामसलत केली की, शिवाजी महाराजांना ठार मारावे की कैद करावे. अखेर त्याने सिद्दी फुलादास हुकूम सोडला, ‘‘शिवाजीस रादअंदाजखानाच्या हवेलीत नेऊन ठेव.’’