
व्यक्ती, काळ आणि परिस्थिती या तीन घटकांदरम्यान साकारणारी गतिमान आंतरक्रिया हे इतिहासलेखनाचे मूलद्रव्य गणले जाते. काळाचे आवाहन अचूक ओळखून त्यानुसार अचाट परिश्रम आणि अतुलनीय पराक्रम यांच्या बळावर लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे परिस्थितीस पूर्णत: नवीन आकार देत असतात. त्या साऱ्या परिवर्तनाचे शब्दरूप दस्तऐवजीकरण म्हणजे इतिहास. आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे नवसृष्टी निर्माण करणाऱ्या अशा हस्तींची जीवनचरित्रे रेखाटताना, त्यामुळे, साहजिकच मुख्य भर दिला जातो तो चरित्रनायकाच्या जीवनप्रवासातील नाट्यमय प्रसंग, रोमहर्षक क्षण, कसोटीची पर्वे आणि निर्णायक वळणे शब्दबद्ध करण्यावर.
अजोड आणि अपूर्व अशा साहसोद्योगाच्या माध्यमातून नवीन, ताजे समाजमन घडविण्यास प्रवृत्त होणारे असे लोकाग्रणी नेमक्या कोणत्या प्रेरणांनी त्या उपक्रमास हात घालतात, कोणती मूल्यव्यवस्था त्यांना जीवनभर स्फूर्ती प्रदान करत राहते, कोणत्या जीवनमूल्यांचे सिंचन घडवत नूतन समाजमन साकारण्यास ते प्रवृत्त झालेले असतात यांसारख्या अतिशय मूलभूत परंतु विलक्षण सूक्ष्म बाबी मात्र इतिहासप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे चरित्र शब्दांकित करण्याच्या पठडीबद्ध चाकोरीमध्ये सरसहा अ-लक्षितच राहतात. ‘सकलजनवादी छत्रपती शिवराय’ हे प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी अक्षरबद्ध केलेले शिवचरित्र चाकोरीबाहेरचे ठरते ते नेमके यांमुळेच.