

डॉ. प्रकाश पवार
सकलजनवाद हे तत्त्वज्ञान शिवरायांच्या जीवनचरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये या तत्त्वज्ञानाचा विकास केला. त्यांनी भारतीय समाजाला या तत्त्वज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची कौशल्ये शिकविली. शिवरायांच्या काळात निर्माण झालेल्या समस्या त्यांनी सकलजनवादी विचारसरणीच्या पद्धतीने सोडविल्या. आज साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त.
स कल जनांचे प्रतिनिधित्व करणे हा सकलजनवादाचा राजकीय व्यवहारातील अर्थ आहे. समावेशनाची प्रक्रिया सकलजनवादामध्ये मध्यवर्ती आहे, त्याचबरोबर कोणाच्याही वगळणुकीला तीव्र विरोध हेही तिचे एक वैशिष्ट्य. सकलजनवाद हे संरक्षण, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणारे तत्त्वज्ञान आहे. सर्वांच्या वित्ताचे आणि जीविताचे संरक्षण करणे, सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणे, रूढीवाद नाकारून प्रगतिवादी विचारांचा किंवा सुधारणावादी विचारांचा पुरस्कार हीदेखील या विचारसरणीची वैशिष्ट्ये.