
अफजलखानाचे वाईला आगमन झाल्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींना शिवाजी महाराजांच्या विरुद्ध वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या. त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे अली आदिलशाहाने मावळच्या देशमुखांना अफजलखानाला जाऊन मिळण्याबाबत कडक फर्माने पाठविली. याशिवाय अफजलखानाने अनेकांना व्यक्तिगत पत्रे पाठविली ती निराळी होती.
मावळचे देशमुख
अली आदिलशाहाने मावळच्या देशमुखांना जी कडक फर्माने रवाना केली होती, त्यापैकी एक भोर तरफेचे देशमुख कान्होजी जेधे यांना आले होते. १६ जून १६५९ तारखेच्या फर्मानात मजकूर होता.
‘‘सीवाने अविचार व दुर्बुद्धीमुळे निजामशाही कोकणातील इस्लामच्या (म्हणजे मुसलमान) लोकांवर उपद्रवाचा हात लांबवून आणि लुटालूट करून बादशाही मुलखातले काही किल्ले स्वतःच्या ताब्यात आणले आहेत. म्हणून अफजलखान मुहम्मदशाही याला त्या बाजूची सुभेदारी देऊन बलाढ्य फौजेसह नेमले आहे.