
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. ते टिकविण्यासाठी किल्लेवैभव उभारले. महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या बारा किल्ल्यांना नुकतेच जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. त्यानिमित्त दर शनिवारी महाराजांच्या किल्ल्यांची गाथा उलगडून दाखवणार आहेत इतिहास अभ्यासक अन् प्रसिद्ध वक्ते डाॅ. श्रीमंत कोकाटे...
मध्ययुगीन काळात गडांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. ज्याच्या ताब्यात गड त्यांची सत्ता. गड-किल्ले हे मध्ययुगीन काळातील सत्ताकेंद्र होते. गड हा सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. धान्य, खजिना, शिबंदी, शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी गड हाच एकमेव उपाय होता. राजा, राजपरिवार यांच्यासाठी गड हेच सुरक्षित निवासस्थान होते. त्यामुळे मध्ययुगात सर्व राजकारण गडकिल्ल्यांभोवती फिरत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी अनेक गड जिंकले... काही नव्याने बांधले, काही गडांचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज शूर होते. ते उत्तम प्रशासक होते. त्यांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे स्वराज्य स्थापन केले. त्यांचे राज्य न्याय, स्वातंत्र्य, समता, महिलांचा सन्मान यावर आधारलेले होते. ते नीतिमान राजे होते. ते उत्तम स्थापत्यतज्ज्ञदेखील होते, असे अभ्यासकांचे मत आहे. याबाबत रमेश देसाई यांचे ‘शिवाजी द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट’ (Shivaji The Last Great Fort Architect) हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. गडकोट कसा असावा, या विषयात ते निष्णात होते. त्यांनी स्वतः बांधून घेतलेले राजगड, प्रतापगड, रायगड, वर्धनगड, सिंधुदुर्ग इत्यादी त्याची साक्ष देतात. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वैश्विक कार्यात गडकोटांचे महत्त्व फार आहे.