

Shravan Month Stories
esakal
श्याम पेठकर - sakal.avtaran@gmail.com
श्रावण म्हणजे केवळ पाऊस, हिरवाई आणि सणवार नव्हे; तर तो आजीच्या गोष्टींतून मनात रुजणारा संस्कारांचा आणि अंतर्मन उजळवणारा ऋतू आहे. त्या कहाण्यांत देव-देवता, नाग-नागिणी आणि राजा-राणी यांच्यासोबत माणसाचे जगणे, त्याचे विकार अन् त्यातून मिळणारा आत्मबोधही दडलेला आहे. श्रावण असा कहाण्यांमधून फुलत जातो, सगुण साकार होतो.
‘आता सारंच बदललं आहे...’ असे उसासे टाकत अनेक पिढ्या म्हणत आल्या आहेत. पाऊसही आता पूर्वीसारखा राहिला नाही, असे म्हणत असताना पाऊस तसाच येतो. आजकाल त्याला एल निनो आणि ला नीना असे नवेच वारे झोंबत असतात... मात्र पाऊस कसाही आला तरीही तो पाऊसच असतो. ग्रेस म्हणतात -
पाऊस कधीचा पडतो... वाऱ्याने हलती पाने...
हलकेच जाग मज आली... दु:खाच्या मंद सूराने...
आपले सगळेच सान्त असते. त्यामुळे ग्रेसांच्या ओळीतला पाऊस ‘कधीचा’ पडतो यातल्या कधीचा काळ आपण फार फार तर गेल्या आठवडाभरापासूनचा, असा विचार करतो. त्यातही पिढी बदलली, की पाऊस झडींची वेगळीच झाडाझडती आपण घेतो.