

Maratha History 17th Century
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
अफजलखानाचा नाश, पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख गमावला, रुस्तुमचा पराभव आणि शिवसैन्याची कुडाळ-विजापूर-गदग लक्ष्मेश्वरापर्यंत धडक यांमुळे आदिलशाही खडबडून जागी झाली. आणि तात्काळ मोठी फौज घेऊन शिवाजीराजांविरुद्ध कोण जाऊ शकेल? याची सर्व सरदारांना विचारणा झाली. अखेर बंडखोर वृत्तीच्या सिद्दी जौहरने हा विडा उचलला.
सिद्दी जौहर हा विजापूरच्या आग्नेयेला सुमारे २७० कि. मी. अंतरावर असणाऱ्या कर्नूलचा एक हबशी सरदार होता. अलीला बादशाह म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर दरबाराचा राग होता. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अली आदिलशाहाने त्याचे गुन्हे माफ केले व त्याला तातडीने कर्नूलहून विजापूरास पाचारण केले. ‘सलाबतखान’ या पदवीने त्याला सन्मानित करण्यात आले. त्याच्यासोबत रुस्तुम-इ जमान, अफजलखानाचा मुलगा फाजिलखान, सादात खान, बाजी घोरपडे, कर्नाटकातील सरदार पीड नाईक, वली खानाचा मुलगा भाई खान, जौहरचा जावई सिद्दी मसूद (मस्सूद), पायदळाचा सेनापती बडे खान, यांशिवाय इतर सरदारांनाही सोबत पाठविले. दुर्दैवाने, स्वराज्यातील काही वतनदार मंडळीही वतनाच्या लालसेने जौहरला सामील झाली. १५ ते २० हजार घोडेस्वार, ३५ ते ४० हजार पायदळ यांशिवाय हत्ती, घोडे, उंट, कर्नाटकी सैन्य, हबशी दल, बंदुके, तोफा, शस्त्रसाठा व विपुल सामग्री सोबत देऊन हे सैन्य फेब्रुवारी १६६०च्या सुमारास विजापूरहून रवाना झाले. अवघ्या एका वर्षांच्या काळात राजांविरुद्ध पाठविलेली ही तिसरी स्वारी...!