

Smart home devices
esakal
पूर्वी रेडिओ, टीव्ही, फॅन, रेफ्रिजरेटर अशी सगळी उपकरणं ‘डंब’ म्हणजे निर्बुद्ध होती. त्यांच्यात इंटेलिजन्स नव्हता. त्या उपकरणांजवळ जाऊन आपल्याला ती उपकरणं बंद किंवा सुरू करावी लागायची. त्यांचा व्हॉल्यूम वाढवायचा असेल तर त्या उपकरणावरचं बटण किंवा नॉब फिरवून ते करावं लागत असे.
यानंतर उपकरणं ‘स्मार्ट’ झाली. याचं कारण त्यांच्यामध्ये चिप्स बसवण्यात आल्या आणि त्या चिप्समध्ये एम्बेडेड सॉफ्टवेअर ‘कोरलेलं’ असे. आपण नेहमी जे सॉफ्टवेअर लिहितो ते लिहून, कंपाइल आणि टेस्ट करून शेवटी डिस्कवर ठेवतो आणि जेव्हा लागेल तेव्हा ते आपल्या कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये लोड करून रन करतो. एम्बेडेड सॉफ्टवेअर तसं नसतं. ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याच्यामध्ये काहीतरी असतं. तो एक प्रोग्रॅमच असतो; पण आपल्या उद्देशाप्रमाणे तो प्रोग्रॅम एका चिपवर कोरला जातो आणि मग ती चिप त्या उपकरणात बसवली जाते. उदाहरणार्थ तापमान कमी-जास्त करणं (एसी), बंद-चालू करणं (सगळीच उपकरणं), ठरावीक वेळ फिरणं (मायक्रोवेव्ह ओव्हन), वेग किंवा दिशा बदलणं (फॅन), व्हॉल्यूम किंवा चॅनेल बदलणं (टीव्ही) असं प्रत्येक उपकरण नियंत्रित करण्यासाठी त्या त्या उपकरणासाठी एक वेगळी चिप आणि त्यावर लिहिलेला एम्बेडेड म्हणजेच चिपवरतीच ‘कोरलेला’ प्रोग्रॅम बनवला जातो. आपण जेव्हा एखाद्या उपकरणाचा रिमोट वापरतो तेव्हा त्या उपकरणातल्या चिपमधल्या एम्बेडेड सॉफ्टवेअरलाच दुरून इन्स्ट्रक्शन देत असतो आणि त्याप्रमाणे ते उपकरण बंद चालू होणं, ठरावीक वेळ फिरणं, वेग किंवा चॅनेल बदलणं अशा अनेक गोष्टी करायला लागतं. हे झालं ‘स्मार्ट’ किंवा ‘इंटेलिजंट’ उपकरण. कारण त्यात आता काहीतरी कृती करण्याइतपत ‘बुद्धी’ निर्माण झाली.