esakal | VPF म्हणजे नेमके काय?
sakal

बोलून बातमी शोधा

VPF}

VPF म्हणजे नेमके काय?

sakal_logo
By
अनिरुद्ध राठी

आपल्या दैनंदिन जीवनात, खास करून पगारदार व्यक्तीने प्रॉव्हिडंट फंड (PF) म्हणजेच भविष्यनिर्वाह निधी हा शब्द नक्कीच ऐकलेला असेल. त्याचबरोबर कधीतरी ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी Voluntary Provident Fund (VPF) हा शब्द सुद्धा कानावरून जातो; परंतु बऱ्याच जणांना हे नेमके काय आहे, याची कल्पना नसते. त्यामुळे VPF म्हणजे नेमके काय, ते पाहूया.

कर्मचारी आपल्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यामध्ये स्वतः होऊन ठराविक रकमेचे ऐच्छिक योगदान करू शकतो आणि यालाच ‘ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी’ अर्थात ‘व्हीपीएफ’ असे आपण संबोधतो. हे ऐच्छिक योगदान कर्मचाऱ्याने त्याच्या ‘ईपीएफ’ (Employee’s Provident Fund) साठी दिलेल्या १२ टक्के योगदानाच्या व्यतिरिक्त असते. या अंतर्गत कर्मचारी जास्तीत जास्त आपल्या मूळ (बेसिक) वेतन आणि महागाई भत्त्याच्या शंभर टक्क्यांपर्यंतचे योगदान करू शकतो. या ऐच्छिक योगदानावर ‘ईपीएफ’च्याच दराने व्याज मिळते.

येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या मालकाला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ‘व्हीपीएफ’मध्ये योगदान देण्याचे बंधन नाही. त्याचप्रमाणे, कर्मचाऱ्यांसाठीही या योजनेमध्ये सहभागी होणे अनिवार्य नसून, हे पूर्णपणे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. एकदा मात्र ‘व्हीपीएफ’मध्ये योगदानाची निवड केल्यानंतर कर्मचारी ते पाच वर्षांच्या मुदतीपूर्वी बंद करू शकत नाही. अशा या ऐच्छिक योजनेचा व्याजदर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच केंद्र सरकार निश्चित करते. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर ‘व्हीपीएफ’ म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, ‘ईपीएफ’चाच विस्तार आहे आणि अशा या ‘व्हीपीएफ’ पर्यायामध्ये असे सर्व पगारदार व्यक्ती आपले ‘अतिरिक्त ऐच्छिक’ योगदान देऊ शकतात, जे आपल्या मालकाच्या म्हणजेच कंपनीच्या ‘पे-रोल’वर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधीचे (व्हीपीएफ) फायदे आणि वैशिष्ट्ये :

- करबचतीचा एक उत्कृष्ट पर्याय : व्हीपीएफ EEE (Exempt, Exempt, Exempt) श्रेणीत येते (म्हणजेच योगदानात सूट, मुद्दलात सूट आणि व्याजातून सुद्धा सूट).

- प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत ‘व्हीपीएफ’चे योगदान आणि जमा झालेले व्याज हे दीड लाख रुपयांपर्यंत वजावटीस पात्र आहे.

- अतिशय सुरक्षित असा गुंतवणुकीचा पर्याय : ही योजना केंद्र सरकारद्वारे निश्चित व्याजदराच्या रूपाने कार्यरत आणि व्यवस्थापित असल्यामुळे इतर गुंतवणुकींच्या पर्यायांच्या तुलनेत ही पूर्णपणे जोखीममुक्त गुंतवणूक मानली जाते.

- सहज, सोपे आणि सुलभ : ‘व्हीपीएफ’ खाते उघडणे आणि हाताळणे अगदी सोपे आणि सुलभ आहे. इच्छुक कर्मचाऱ्यांनी त्याच्या मालकाच्या संबंधित विभागांमध्ये संपर्क साधून आपल्या चालू ‘ईपीएफ’ खात्यामध्येच नोंदणी फॉर्मद्वारे ‘व्हीपीएफ’साठीची अतिरिक्त योगदानाची विनंती एका अर्जाद्वारे केली, की ही योजना चालू होऊ शकते.

- आकर्षक परतावा : चालू परिस्थितीमध्ये, या योजनेअंतर्गत वार्षिक ८.५० टक्के दराने व्याज मिळते, जे सद्यःस्थितीत मुदत ठेवींमधील गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे.

- सुलभ हस्तांतर : नोकरी बदलल्यानंतर हे खाते पूर्वीच्या मालकाकडून दुसऱ्या नव्या मालकाकडे अगदी सुलभरित्या हस्तांतरित म्हणजेच ‘ट्रान्स्फर’ केले जाऊ शकते.

- पैसे काढण्याची मुभा : या योजनेमधून नियमानुसार अंशतः पैसे काढता येऊ शकतात; तसेच कर्ज सुद्धा मिळू शकते. जर पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच रक्कम काढली तर काढलेल्या रकमेवर प्राप्तिकर भरावा लागतो.

- निवृत्तीच्या वेळी एकरकमी रक्कम : सर्वसाधारणपणे कर्मचारी निवृत्त झाल्यावर किंवा त्याने राजीनामा दिल्यावर, अंतिम देय रक्कम कर्मचाऱ्याला दिली जाते. तसेच कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित (नॉमिनी) व्यक्तीला या ‘व्हीपीएफ’ खात्यांमध्ये जमा झालेल्या निधीचा ताबा मिळू शकतो.

अशी ही ‘व्हीपीएफ’ योजना प्रामुख्याने पगारदार व्यक्तींना फायदेशीर ठरू शकते. कारण एखादा अनपेक्षित मोठा वैद्यकीय खर्च किंवा मुला-मुलींचे उच्च शिक्षण आणि लग्न यासारख्या प्रसंगी; तसेच नवे घर बांधण्यासाठी या ‘व्हीपीएफ’ खात्यामध्ये जमा झालेला पैसा नक्कीच कामी येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर पगारदार कर्मचारी असाल आणि तुम्ही जोखीममुक्त चांगला परतावा देणारा पर्याय शोधत असाल, तर ‘व्हीपीएफ’चा विचार करण्यास हरकत नाही.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)