

Social Commentary
esakal
मॅनहोल म्हटले, की तुमच्या डोळ्यासमोर येत असेल शहरांमधील गटारांवर असलेले एक जाडजूड लोखंडी झाकण. गटारांमधील घाण वाढली, साचली, अडकली आणि त्यात कचऱ्याची कोंडी झाली, की मग हे मॅनहोल उघडले जाते. गटारातली घाण बाहेर काढली जाते. मात्र, समाजात वावरणारी, डोक्यात खड्डा असणारी चालतीफिरती मॅनहोल आपल्याला सहज दिसत नाहीत. सामाजिक जीवनात अशी गटारे आता ओसंडून वाहू लागली आहेत. या गटारातून रोज नवी घाण बाहेर पडते. कधी
जाती-पातीची, कधी भ्रष्टाचाराची, कधी मारहाणीची; तर कधी शिव्याशापांची. विशेष म्हणजे, हे मॅनहोल बंद करण्याची कुठलीही सोय आपल्याकडे नाही. यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अद्भुतरंजक, स्वप्नरम्य, सहस्यमय शहाणपणाची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. रस्त्यावरील मॅनहोलपेक्षा माणसाच्या डोक्यातील हे खड्डे अधिक धोकादायक आहेत. कारण रस्त्यावरील खड्डा एखाद्याचा जीव घेतो; पण विचारांतील खड्डे संपूर्ण व्यवस्थेला निष्क्रिय करतात.
आपल्या सर्वांच्या अंगी शहाणपण आहे. म्हणून तर आपण माणसे आहोत. आपल्यात जर समजुतीची, समजदारीची, शहाणपणाची खूण नसती तर आपली गणतीदेखील प्राण्यांमध्येच झाली असती. पण, माणूसपणाची ओळख असलेली ही शहाणिवेची जाणीव आपल्यात जन्मतःच असली तरीसुद्धा प्रत्येक जण निव्वळ शहाणाच असतो, असे काही नाही. काही जण शहाणपणाच्या पलीकडेसुद्धा जातात. काही बौद्धिक पातळीवर अत्यंत उंची गाठतात. काही हुशारीचे अनेक टप्पे पार करतात आणि विद्वानांच्या रांगेत जाऊन बसतात; तर काही अतिशहाणेसुद्धा असतात. आता तुम्ही त्यांच्या बुद्धीचे माप काढताना कुठली फूटपट्टी वापरली यावर ते शहाणे आहेत की अतिशहाणे, हे ठरते. किंबहुना तुम्हाला निदान त्या माणसांच्या बुद्धीचे किंवा अल्पबुद्धीचे सौंदर्यदर्शन हे होतेच.