

Social Sector Funding in India
esakal
पल्लवी पाटील - pallavi.patil@sevatarang.org
समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार आणि आत्मसन्मानाने जगण्याच्या संधी मिळाव्यात, यासाठी सामाजिक संस्थांना सरकार, कंपन्या आणि वैयक्तिक देणगीदारांकडून निधी मिळतो. सामाजिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रमुख स्रोत, त्यांची भूमिका; तसेच वैयक्तिक देणगीदार म्हणून आपण घडवू शकणारा सामाजिक बदल आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीतील आपले योगदान यावर प्रकाशझोत...
समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार आणि आत्मसन्मानाने जगण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. या सामाजिक कार्यांसाठी आवश्यक असलेला निधी सरकार, कंपन्या आणि वैयक्तिक देणगीदार अशा विविध स्रोतांतून उपलब्ध होतो. सामाजिक विकासाची जबाबदारी केवळ सरकार किंवा कंपन्यांची नसून, त्यात देशातील प्रत्येक नागरिकाचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
सरकारी योगदान (योजना आणि अनुदान)ः भारताच्या सामाजिक क्षेत्रासाठी सरकारी योगदान हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये सामाजिक क्षेत्रासाठी झालेले सरकारी योगदान साधारण २५ लाख कोटी रुपये एवढे होते. हे योगदान सामाजिक क्षेत्रातील एकूण खर्चाच्या अंदाजे ९५ टक्के होते. सरकारी योगदानातून शाळा, रुग्णालये, रोजगार आणि इतर सामाजिक योजनांना आर्थिक पाठबळ मिळते. प्रधानमंत्री कौशल विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान यांसारख्या योजनांद्वारे अनेक गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवली जाते.