
सो लापुरात मराठी आणि मराठीमिश्रित हिंदीसह उर्दू, कन्नड आणि तेलुगू, या भाषा बोलल्या जातातच, पण गुरुनानक नगरमध्ये सिंधी, चाटी गल्लीत मारवाडी-राजस्थानी, सेटलमेंट-रामवाडी भागात कैकाडी, टकारी, पारधी, कंजारभाट यांच्यासह एकूण १७ समाजांतील लोकांच्या बोलीभाषा इथे बोलल्या जातात. हे सगळे लोक मराठीत बोलायला लागतात, तेव्हा त्यांची एक आगळीवेगळी ‘सोलापुरी बोली’ होते. गिरणी कामगार, त्यांच्या चाळी, बहुभाषकांच्या गल्ली-बोळांतून ही बोली विकसित झाली आहे.
सोलापुरातील शुक्रवार पेठ, ‘टोळाचं बोळ’ आणि दक्षिण कसब्यात माझं बालपण गेलं. चौथीपर्यंतचं माझं शिक्षण गवई गल्लीतल्या लोणी मराठी विद्यालयात झालं. टिळक चौक, सराफ कट्टा, भांडेगल्ली, दक्षिण आणि उत्तर कसबा, मसरे गल्लीतील बहुतांश कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीबांची मुलं-मुली आमच्या वर्गात होती. आम्हा सगळ्यांचीच सोलापुरी बोली! अर्थात तेव्हा तिचं वेगळेपण काही जाणवत नसे. ‘काय करायला बे’, ‘ए ह्येनं’ (नाव न घेता हाक मारणे), ‘हप्पक खायला’ (कच खाणारा), ‘व्हटकल’ (विद्रूप), ‘अंडाफाईट’ (बोलाफुलाची गाठ पडणे), ‘ओ अन्ना’, ‘उचलटांगडी’, असे शब्दप्रयोग आमच्या सोलापुरी हेल असलेल्या संवादांतून सहजतेनं वापरले जात. आजही वापरले जातात.