
संजीव साबडे
कमीत कमी जागेचा अधिकाधिक वापर कसा करायचा याचं तंत्र मुंबईतल्या फर्निचरवाल्यांनी आता पूर्ण विकसित केलं आहे. फोल्ड करता येणाऱ्या फर्निचरच्या साह्यानं लहान घरातही जीवन सुसह्य करण्याच्या कल्पना अमलात आणणं मुंबईकरांना पुरेपूर जमलंय. मुंबईतल्या छोट्यातल्या छोट्या घरांतही सोफा कम बेड, फोल्डिंग डायनिंग व स्टडी टेबल, फोल्डिंग चेअर्स, शोकेस, वॉल माउंट टीव्ही आणि छोटा फ्रिज व वॉशिंग मशिन या वस्तू सहज दिसतात.
मध्यंतरी मित्रासह वरळीला आयकियाच्या मॉलमध्ये गेलो होतो. तो पाहून थक्क झालो! तिथलं फर्निचर पाहून नव्हे, पण फर्निचरचा मॉलही असू शकतो, असं कधी स्वप्नातही आलं नव्हतं, म्हणून. आतापर्यंत फर्निचरची दुकानं पाहिली होती.